लडाखमध्ये चिनी सैन्याने केलेल्या घुसखोरीच्या मुद्यावर मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध स्तरांवर प्रयत्न करण्यात येत असल्याचे संरक्षणमंत्री ए. के. ऍंटनी यांनी बुधवारी सांगितले. या मुद्द्यावर शांततामय मार्गाने तोडगा काढण्यासाठी विविध स्तरांवर वाटाघाटी करण्यात येत असल्याचे ऍंटनी यांनी पत्रकारांना सांगितले. देशाची सुरक्षितता आणि एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी सरकार सर्व उपाययोजना करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
लडाखमध्ये चिनी सैन्याने केलेल्या दहा किलोमीटरच्या घुसखोरीच्या मुद्यावरून भारत व चीनमधील तणाव वाढला आहे. दोन्ही लष्करांच्या ध्वजबैठकीत तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या पातळीवर मंगळवारी तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे चिनी सैन्याला थोपवण्यासाठी भारताने लडाखमध्ये लष्करी कुमक पाठविण्याची तयारी चालवली आहे.
लडाखमधील घुसखोरीबाबत चीनने पूर्वीप्रमाणे ‘जैसे थे’ स्थिती ठेवावी, असे भारताच्या परराष्ट्र खात्याने मंगळवारी चीनला खडसावले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भातील मतभेदांमुळे चीनचा सध्याचा घुसखोरीचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सैद अकबुरुद्दीन यांनी सांगितले.