सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या खासगीकरण करण्याचे केंद्र सरकारने निश्चित केले असून ही कंपनी विकत घेण्यासाठी अनेक लोक उत्सुक असल्याचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी स्पष्ट् केले. त्यामुळे आता एअर इंडियाच्या खासगीकरणाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

पुरी म्हणाले, “एअर इंडियाचे खाजगीकरण करण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यामुळे शक्य तितक्या कमीत कमी वेळेत आम्हाला चांगला व्यवहार करायचा आहे. त्याकरीता वैकल्पिक यंत्रणा तयार करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गटाची स्थापना करण्यात आली आहे. याबाबत कॅबिनेट सचिवालय स्तरावर बैठकही पार पडली आहे.

पुरी पुढे म्हणाले, कंपनीचे संपूर्ण खाजगीकरण कमीतकमी वेळेत आणि उत्तम सौद्याद्वारे केले जाईल. लोक एअर इंडिया घेण्यास उत्सुक आहेत कारण ती अव्वल दर्जाची विमान कंपनी आहे. जो कोणी एअर इंडिया खरेदी करेल तो खूप भाग्यवान असेल आणि खासगी क्षेत्रातील मजबूत तत्वांनुसार ते चालवण्यास सक्षम असेल.

भारतीय विमानतळांचे आर्थिक नियामक प्राधिकरण (दुरुस्ती) विधेयक २०१९ राज्यसभेत ३ ऑगस्ट रोजी मंजूर झाले. यामुळे मोठ्या विमानतळांवरील वार्षिक प्रवाशांची संख्या ३५ लाखांच्यावर जाईल. दरम्यान, एअर इंडियाचे खासगीकरण करणे भागच आहे कारण कंपनीवरील कर्ज पूर्णपणे अस्थिर असल्याचे पुरी यांनी यावेळी सांगितले.