करोना संकटाच्या काळात भाजपा आणि काँग्रेसमध्ये टूलकिटवरुन राजकारण चांगलं तापलं आहे. या टूलकिटवरुन  ट्विटरने आपली भूमिका स्पष्ट केली होती. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी १८ मे रोजी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी टूलकिटचा संदर्भ देत करोना काळात पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्याचे काम काँग्रेस करत असल्याचा आरोप केला होता. ट्विटरने या ट्विटला ‘मॅन्युपुलेटेड मीडिया’ (काही विशिष्ट हेतूने बातम्या देणारी प्रसारमाध्यमे) असल्याचे म्हटले होते. याचाच अर्थ हे तथ्यानुसार खोटं असल्याचे म्हटले होते. दरम्यान आता ट्विटरला हा टॅग काढण्याची सूचना सरकारने केली आहे.

भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी १८ मे रोजी कथित “टूलकिट”चे फोटो आपल्या ट्विटवर टाकले होते. त्यानंतर ट्विटरने गुरुवारी संध्याकाळी हे ही माहिती चुकीची असल्याचे सांगत त्या ट्विटला ‘मॅन्युपुलेटेड मीडिया’ असा टॅग दिला होता.

याप्रकरणी तपास सुरु असल्याने सरकारने ट्विटरला ‘manipulated media’ हा टॅग काढण्यास सांगितलं आहे. कायदेशीर तपास सुरु असल्याने याप्रकरणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणताही आदेश देऊ शकत नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

ट्विटरवर नव्हे तर तपास यंत्रणा या संदर्भात योग्य माहिती देईल. माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने चौकशी प्रक्रियेत हस्तक्षेप करू नका असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ट्विटरच्या जागतिक स्तरावरील टीमसोबत संवाद साधत कडक शब्दांमध्ये यावर टीका केली आहे. मंत्रालयाने टूलकिटवरील टॅग काढण्याची सूचना केली आहे. काही राजकीय नेत्यांनी टूलकिटचा वापर करुन काळात देशात सरकारची प्रतिमा  करोना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.