पंजाबमधील पठाणकोटमध्ये लष्कराच्या छावणीच्या गेटवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. छावणीच्या त्रिवेणी गेटवर दुचाकीस्वारांनी ग्रेनेड फेकले. या घटनेनंतर पठाणकोटच्या सर्व भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांची ओळख पटवली जात आहे. ग्रेनेडचा स्फोट झाल्याचे प्रथमदर्शनी वाटत आहे. पुढील तपास सुरू आहे. एक मोटारसायकल निघून गेली, त्याचवेळी स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळण्याची आशा आहे, असे पठाणकोटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुरेंद्र लांबा यांनी सांगितले.
रविवारी रात्री उशिरा दुचाकीस्वारांनी पठाणकोटच्या काथवाला पुलावरून धीराकडे जाणाऱ्या लष्कराच्या त्रिवेणी गेटवर ग्रेनेड फेकले. त्यामुळे मोठा स्फोट झाला. मात्र, गेटवर कर्तव्यावर असलेले जवान काही अंतरावर होते. त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. ग्रेनेड फेकणारे दुचाकीस्वार कुठून आले आणि कुठे गेले, हे लष्करी अधिकारीही सांगू शकले नाहीत.
स्फोटाची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. पोलीस आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाक्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पठाणकोट हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या लष्कराच्या तळांपैकी एक आहे. त्यात हवाई दलाचे स्टेशन, लष्करी दारूगोळा आणि दोन आर्मर्ड ब्रिगेड आणि आर्मर्ड युनिट्स आहेत. जानेवारी २०१६ मध्ये पठाणकोट एअरफोर्स स्टेशनवर दहशतवादी हल्ला झाला होता. पठाणकोट एअरफोर्स स्टेशनवर मोठ्या प्रमाणात दारूगोळा असलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात पाच दहशतवादी ठार झाले, तर लष्कराचे आठ जवान शहीद झाले.