हिंदी महासागरात चीनकडून तैनात करण्यात आलेली पाणबुडी आणि सिक्किम परिसरातील सीमावाद यामुळं भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत अधिकच सावध झाला आहे. भारतीय नौदलाच्या अवकाशातील ‘तिसरा डोळा’ समजल्या जाणाऱ्या ‘रुक्मिणी’ (जीसॅट-७) GSAT 7 या उपग्रहाद्वारे चीनच्या हालचालींवर करडी नजर ठेवली जात आहे.

‘रुक्मिणी’ या उपग्रहाचं वजन २६२५ किलो आहे. २९ डिसेंबर २०१३ रोजी या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. या उपग्रहाद्वारे हिंदी महासागरातील विस्तृत जलक्षेत्रात २००० किलोमीटरपर्यंतच्या संशयित हालचाली टिपणं भारतीय नौदलासाठी सोपं झालं आहे. संपर्क आणि देखरेख ही दोन्ही कामं चोख बजावणारे हे उपग्रह पृथ्वीपासून ३६ हजार किलोमीटर उंचावरून बारीक लक्ष ठेवून आहे. हिंदी महासागरातील हालचालींच्या अचूक वेळांचं अपडेट ठेवण्याचं काम हे उपग्रह करतं. या उपग्रहाच्या मदतीनं अरबी समुद्रापासून बंगालच्या खाडीपर्यंत करडी नजर ठेवणं शक्य झालं आहे.

दरम्यान, या उपग्रहाने आणि लांब पल्ल्याच्या नौदलाच्या विमानाने चिनी नौदलाच्या हालचाली याआधीही टिपल्या आहेत. याशिवाय हिंदी महासागरातील पाणबुड्यांनीदेखील चिनी नौदलाच्या हालचालींची नोंद केली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये हिंदी महासागरात चिनी नौदलाच्या किमान १३ तुकड्यांच्या हालचालींची नोंद भारतानं केली आहे. यामध्ये चीनचे अत्याधुनिक क्षेपणास्त्र हुयांग-३ चा समावेश आहे. चीनकडून हिंदी महासागरात युआन वर्गातील डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी तैनात केली असल्याचं समोर आलं होतं. चीनकडून हिंदी महासागरात तैनात करण्यात आलेली ही सातवी पाणबुडी असून, तिच्या मदतीसाठी सीएनएस चोंगमिंगडाओ ही युद्धनौकाही तैनात केली होती.