पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सौदी अरेबियातील गुंतवणूकदारांना ग्वाही
पूर्वलक्ष्यी प्रभावाने करआकारणीची पद्धत ही भूतकाळातील गोष्ट झाली आहे, तसेच वस्तू व सेवा कर (जीएसटी) नजीकच्या काळात लागू होईल, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणूकदारांना भारतात उद्योगासाठी पोषक वातावरण आणि स्थायी कररचनेचे आश्वासन दिले.
सौदी अरेबियातील उद्योजकांनी भारताच्या संरक्षण, ऊर्जा, रेल्वे, आरोग्य व कृषी क्षेत्रांत गुंतवणूक करावी, असे आवाहन मोदी यांनी केले. वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) स्वरूपात सामायिक अप्रत्यक्ष करआकारणीची प्रणाली ‘लवकरच अमलात येईल’ असे सांगणाऱ्या मोदींनी त्यासाठी निश्चित कालमर्यादा मात्र सांगितली नाही.
सौदी अरेबियाच्या दोन दिवसीय दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी सौदी व भारतीय उद्योगपतींच्या एका निवडक गटाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने विदेशी गुंतवणुकीसाठी अनेक क्षेत्रे खुली केली असून जागतिक आर्थिक मंदीच्या काळात भारत हा ‘आशेचा प्रकाश’ बनला आहे.
ज्यांचे उत्तरदायित्व बरेच वाढले आहे, अशा राज्य सरकारांतर्फे संचालित वीज कंपन्यांच्या बुडीत कर्जाच्या (एनपीए) ओझ्यातून बँकांना मुक्त करून देशातील बँकांचे जाळे मजबूत करण्याचा आपले सरकार प्रयत्न करत असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
प्रशासकीय अडथळे हटवण्यासोबतच गुंतवणूकदारांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी भारताने अनेक धोरणविषयक उपक्रम आखले आहेत. यामुळेच, जेथे उद्योग करण्यासाठी पोषक वातावरण आहे अशा देशांच्या यादीत जागतिक बँकेने भारताला बाराव्या क्रमांकावर ठेवले आहे.
आज जग अतिशय गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत असून अशा परिस्थितीत भारत हा आशेचा किरण आहे. जागतिक बँक, जागतिक नाणेनिधी व पत मानांकन संस्था या सर्वाच्याच मते भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे, याचाही मोदी यांनी उल्लेख केला.
भारतात पूर्वलक्ष्यी प्रभावाने करआकारणी (रिट्रॉस्पेक्टिव्ह टॅक्सेशन) आता अस्तित्वात नाही. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळातील दोन प्रकरणे न्यायाधीन असून त्याबाबत भाष्य करणे उचित ठरणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gst will be rolled out soon pm modi
First published on: 04-04-2016 at 02:29 IST