गुजरात दहशतवादविरोधी पथकाने आयसिसशी संबंधित दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील एकाला भावनगर तर दुसऱ्याला राजकोटमधून अटक करण्यात आली होती. अटक करण्यात आलेले दोघेही सख्खे भाऊ आहेत. विशेष म्हणजे दोघेही उच्चशिक्षित असून संगणकतज्ज्ञ आहेत. दोन्ही संशयित दहशतवाद्यांकडून गन पावडरसोबत विस्फोटके बनवण्यासाठी वापरण्यात येणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन अटक करण्यात आलेल्या मोठ्या भावाचे नाव वसीम असून त्याचे वय ३० वर्षे आहे. तर लहान भावाचे नाव नईम असून त्याचे वय २६ वर्षे आहे. वसीमने एमसीए तर नईमने बीसीए केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून वसीम आणि नईम आयसिसच्या संपर्कात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. वसीम आणि नईमने याबद्दलची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ‘बिग कॅट’ नावाने कार्यरत असलेल्या हँडलरच्या संपर्कात असल्याची माहिती वसीम आणि नईमने दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांनी १५ दिवसांपूर्वी गुजरातमधील एका धार्मिक स्थळावर हल्ला करण्याची योजना आखली होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना हा हल्ला करता आला नाही. गुजरातमधून पहिल्यांदाच आयसिसशी संबंधित संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातून मुफ्ती अब्दुल कासमीला अटक केली होती. गुजरातमधून अटक करण्यात आलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांचा कासमीशी संबंध असल्याची शक्यता आहे.