Police officer’s son car crash गुरुवारी गुजरातमधील भावनगरमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने ह्युंदाई क्रेटा कारने पादचाऱ्यांना आणि दुचाकींना धडक दिली. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावनगरमधील कालियाबीड परिसरातील भगवती सर्कल ते शक्ती माताजी मंदिरादरम्यान दुपारी ४.३० वाजता ही घटना घडली. भार्गव भट्टी (३०) आणि चंपा वाचानी (६५) या दोघांचा कारने दिलेल्या धडकेमुळे मृत्यू झाला आहे.

पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला अटक

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भावनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक उपनिरीक्षक अनिरुद्धसिंह गोहिल यांचा मुलगा हर्षराजसिंह गोहिल कार चालवत होता. अपघाताच्या वेळी हर्षराजसिंह वेगाने गाडी चालवत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका खाजगी कंपनीत काम करणारा भार्गव भट्टी हा त्याच्या मित्राबरोबर रस्त्याच्या कडेला उभा होता तेव्हा गाडीने त्याला धडक दिली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दोन महिलांसह तिघांना सर टी जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी उपचारादरम्यान चंपा वाचानी यांचा मृत्यू झाला.

भावनगर शहराचे उपअधीक्षक (डीएसपी) आर. आर. सिंघल यांनी एका व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये म्हटले, “प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कार चालकाने बेपर्वाईने आणि वेगाने गाडी चालवली आणि लोकांना धडक दिली. निलंबग पोलीस ठाण्याचे निरीक्षक मृतांच्या कुटुंबीयांशी बोलले आहेत आणि या प्रकरणात त्यांची तक्रार नोंदवणार आहेत.

उपअधीक्षक सिंघल यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले, “गाडीच्या चालकाने भावनगर पोलिसात काम करणाऱ्या त्याच्या वडिलांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्याच्या वडिलांनी नियंत्रण कक्षाला, मला आणि निलंबग पोलीस निरीक्षकांना दिलेल्या माहितीमुळेच रुग्णवाहिकेला लवकरात लवकर कळवण्यात आले आणि जखमींना तातडीने उपचार मिळाले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंघल म्हणाले की, निलंबग पोलिसांनी सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(अ) (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत गुन्हा दाखल केला. परंतु, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळवल्यानंतर आम्ही न्यायालयाला १०६ (सदोष मनुष्यवध) यासह अतिरिक्त कलमे समाविष्ट करण्याची विनंती केली, जी एक अजामीनपात्र गुन्हा आहे आणि किमान सात वर्षांची शिक्षा आहे,” असे ते म्हणाले. तपास सुरू असल्याने हर्षराजसिंह पोलिस कोठडीत आहे.