बडोद्यात १८५० साली बांधण्यात आलेला नजरबाग महाल पाडण्याच्या कारवाईला शुक्रवारी गुजरात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली़  हा महाल सध्या बडोद्याच्या राजघराण्याचे सदस्य संग्रामसिंह गायकवाड यांच्या ताब्यात आह़े
महाला पाडण्याच्या सध्या सुरू असलेल्या प्रक्रियेला न्यायमूर्ती आऱ डी़  कोठारी यांनी शुक्रवारी स्थगिती दिली़  तसेच यासंदर्भात न्यायालयाने राज्याचे मुख्य सचिव, बडोदा महापालिका, भारतीय पुरातत्त्व संशोधन विभाग आणि गायकवाड यांचे पुत्र प्रतापसिंह यांना नोटीसही बजावली आह़े आयआयए आणि  ‘इंटाच’ या न्यासाचे निमंत्रक संजीव जोशी यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली होती़
या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ जून रोजी ठेवण्यात आली असून, तोवर महालाचे काम जैसे थे ठेवण्याचे आदेश गायकवाड यांना न्यायालयाने दिले आहेत़  नजरबाग महाल ही वास्तू गायकवाड यांच्या सत्तेच्या काळातील आह़े  त्यामुळे ती पारंपरिक वारसा असलेली इमारत आहे, अशी बाजू याचिकादारांच्या वतीने अॅड़ दीपेन देसाई यांनी मांडली़  या इमारतीला ऐतिहासिक वारसा यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रियाही सुरू आहे, याकडे देसाई यांनी लक्ष वेधल़े
संग्रामसिंह यांच्या कुटुंबीयांकडून या वास्तूच्या ठिकाणी व्यावसायिक आणि निवासी संकुल उभारण्याची योजना आह़े  १.७५ लाख चौरसफुटांवर हा महाल उभा आह़े  महाल मोडकळीस आल्याने या पावसाळ्यातही तगू शकणार नाही, असे गायकवाड कुटुंबीयांचे म्हणणे आह़े