Surat teacher suicide case: पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची कुणकुण लागल्यानंतर एका सुखी संसारात मिठाचा खडा पडला. पती-पत्नी दोघांनाही चांगली नोकरी होती. पण पत्नीच्या विवाहबाह्य संबंधामुळे सर्वच बिघडलं. अखेर एका पतीनं दोन मुलांना विष पाजून स्वतःदेखील आत्महत्या केली. गुजरातमधील सूरत येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. खासगी शाळेत पीटीचे शिक्षक असलेल्या अल्पेशभाई सोलंकी यांनी ७ आणि २ वर्ष वय असलेल्या मुलांसह जीवनयात्रा संपवली. यानंतर आता पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलं आहे.
सूरतच्या दिंडोली येथील अल्पेशभाई सोलंकी (वय ४१) हे एका शाळेत पीटीचे शिक्षक होते. तर त्यांची पत्नी जिल्हा पंचायत कार्यालयात काम करतात. दोन दिवसांपूर्वी अल्पेशभाईंच्या पत्नीनं त्यांना फोन केला पण ते उत्तर देत नव्हते. त्यामुळे पत्नीनं घरी धाव घेतली. मात्र घराचा दरवाजा आतून बंद होता. नातेवाईकांना बोलवून दरवाजा तोडण्यात आला. आत गेल्यावर जे दिसले ते मन हेलावून टाकणारे दृश्य होते.
सूरतचे पोलीस उपायुक्त विजय सिंह गुर्जर यांनी सांगितले की, दोन्ही लहान मुलांचे मृतदेह बेडवर होते. तर तिथेच शेजारी अल्पेशभाई यांचाही मृतदेह आढळून आला. यानंतर पोलीस तपासात अल्पेशभाई यांनी लिहिलेली काही पत्रे, डायरी आणि मोबाइलमध्ये चित्रीत केलेले व्हिडीओज आढळले आहेत.

अल्पेशभाई यांच्या भावाने अल्पेशभाई यांची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे. वहिनीच्या विवाहबाह्य संबंधामुळे माझे बंधू खूप तणावात होते आणि म्हणूनच त्यांनी दोन्ही मुलांसह जीवन संपवले, असा आरोप अल्पेशभाईंच्या भावाने केला.
पोलिसांना मिळालेल्या डायरीमध्ये अल्पेशभाई यांनी बरेच काही लिहून ठेवले आहे. मागच्या एक ते दोन महिन्यांपासून ते नियमित डायरी लिहित होते. तसेच पाच ते सहा पानांची सुसाइड नोटही आढळून आली आहे. डायरी आणि ही नोट पोलिसांनी तपासासाठी जप्त केली आहे. अल्पेशभाई यांनी आपले पालक, भाऊ आणि पत्नीला उद्देशून यात मजकूर लिहिला आहे.