गुजरातमध्ये २०१५ साली झालेल्या पाटीदार आंदोलनानंतर राजकीय क्षितीजावर उदयाला आलेला ओबीसी एकता मंचचा नेता अल्पेश ठाकोर याने शनिवारी काँग्रेसमध्ये सामील होण्याची घोषणा केली. २३ ऑक्टोबरला गुजरातमध्ये होणाऱ्या सभेत आपण राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करू, असे अल्पेशने सांगितले. गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अल्पेश ठाकोर यांचा काँग्रेस प्रवेश अत्यंत महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे. अल्पेश यांच्या या घोषणेमुळे उत्तर गुजरात आणि सौराष्ट्रात ओबीसीबहुल विधानसभा जागांवर काँग्रेसला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आगामी काळात भाजपविरोधातील विरोधकांची मोट बांधण्यात असेच यश मिळत राहिल्यास निवडणुकीत काँग्रेसचे पारडे जड ठरण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज काँग्रेसचे गुजरातचे निवडणूक प्रभारी अशोक गेहलोत, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांच्यासोबत अल्पेश ठाकोर यांनी राहुल गांधींची भेट घेतली. या भेटीनंतर अल्पेश यांनी भाजपच्या ‘गुजरात मॉडेल’च्या घोषणेवर हल्लाबोल केला. गुजरातमधील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. युवक बेरोजगार आहेत आणि दारूबंदी केल्यानंतर देखील दरवर्षी हजारो लोक दारुमुळे मृत्युमुखी पडल्याचे राहुल गांधींच्या भेटीनंतर ठाकोर म्हणाले.

काँग्रेस पक्षाकडून सध्या बिहारच्या धर्तीवर गुजरातमध्ये महाआघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, संयुक्त जनता दलाचे बंडखोर आमदार छोटू वासवा, दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवानी यांना आघाडीत सामील करुन घेण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. यासाठी संयुक्त जनता दलाचे बंडखोर आमदार छोटू वासवा यांच्याशी चर्चा सुरु केली आहे. राज्यसभा निवडणुकीत छोटू वासवा यांनी भाजपऐवजी काँग्रेसचे अहमद पटेल यांना मतदान केले होते. वासवा हे जदयूचा गुजरातमधील चेहरा असून, आदिवासी समाजाचे नेते म्हणून ते ओळखले जातात. वासवा हे शरद यादव गटातील असून, लवकरच ते महाआघाडीबाबत काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करतील असे समजते. तर हार्दिक पटेलने काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास नकार दिला असला तरी भाजपविरोधी एकजूटीने उभे राहण्याला त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. याशिवाय, दलित चेहरा म्हणून समोर आलेल्या जिग्नेश मेवाणी यांचाही भाजप हा प्रमुख विरोधक आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची हातमिळवणी करण्याची तयारीही भाजपने दर्शविली आहे. या सर्वांचा पाठिंबा मिळाल्यानंतर काँग्रेसला १८२ पैकी १२५ पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावा काँग्रेसचे गुजरात अध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat patidar agitation leader alpesh thakore to join congress
First published on: 21-10-2017 at 22:56 IST