Honour Killing in Gujarat: महाराष्ट्रात २०१६ साली प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटामुळे ऑनर किलिंगचा प्रकार चर्चेत आला. आपल्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केल्यामुळे जन्मदात्या मुलीचे कुटुंबिय मुलीच्या जीवावर उठल्याचे अनेक प्रकार राजरोसपणे घडत असतात. गुजरातमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका तरूणीने रात्री इन्स्टाग्रामवर आपल्या प्रियकराला मेसेज करत ‘मला वाचव’, असा संदेश पाठवला आणि त्यानंतर तासाभरात तिच्या मृत्यूची बातमी समोर आली.
सदर घटना बनासकांठा जिल्ह्यात घडली. चंद्रिका चौधरी (वय १८) हीचा तिचे वडील सेंधाभाई पटेल आणि काका शिवाभाई पटेल यांनी खून केला. हत्या केल्यानंतर सदर मृत्यू नैसर्गिक असल्याचा बनाव त्यांनी रचला होता, मात्र हा बनाव पोलीस तपासात उघड झाला. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. तर मुख्य आरोपी असलेले वडील फरार आहेत, अशी माहिती सह पोलीस अधीक्षक सुमन नाला यांनी दिली.
मृत तरूणी हरीश चौधरी नामक युवकाच्या प्रेमात होती. मात्र त्यांच्या नात्याला कुटुंबियांनी विरोध केला होता. मुलीचे लग्न दुसरीकडे ठरविण्याचा कुटुंबियांनी निर्णय घेतला होता. मात्र चंद्रिकाने हा निर्णय मान्य नसल्याचे कुटुंबियांना सांगितले. तसेच हरीशला मेसेज करत तिच्या जीवाला धोका असल्याचीही माहिती तिने दिली.
मेसेजमध्ये चंद्रिकाने काय लिहिले?
२४ जूनच्या रात्री चंद्रिकाने हरीशला मेसेज केला. “ये आणि मला वाचव नाहीतर माझ्या घरचे दुसऱ्याशी माझे लग्न लावून देतील. मी जर विरोध केला तर ते मला मारतील. मला वाचव”, असा मेसेज हरीशला पाठवला गेला. मात्र त्याच्या तासाभरानंतर तिचा मृतदेह आढळून आला.
आत्महत्येचा बनाव
चंद्रिकाचा मृत्यू आत्महत्या केल्यामुळे झाला, असा बनाव रचला गेला. मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिचा खून केल्याचे सिद्ध झाले. चंद्रिकाच्या मृत्यूनंतर प्रियकर हरीशने पोलिसांत जाऊन तक्रार दिली होती. ती आत्महत्या करू शकत नाही, तिचा खून झाला असावा, असा संशय हरीशने व्यक्त केला होता.
सह पोलीस अधीक्षक सुमन नाला म्हणाल्या की, मुलीचे वडील आणि काकांनी मिळून तिचा खून केला होता. खून होण्याच्या एक दिवस चंद्रिका आणि हरीश घरातून निघून गेले होते. मात्र तिच्या कुटुंबियांनी तिची बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली होती. त्यानुसार त्या दोघांना शोधून पोलिसांनी चंद्रिकाला परत पालकांच्या स्वाधीन केले.
हत्या करून मृत्यूचा दाखलाही बनवला
चंद्रिकाच्या मेसेजनंतर तिचा कोणताही संपर्क होत नसल्यामुळे हरीशने न्यायालयात हेबियस याचिका दाखल केली होती. मात्र सुनावणीच्या एक दिवशीच कळले की, तिचा मृत्यू झाला आहे. तिच्या कुटुंबियांनी चंद्रिकाचा मृत्यूचा दाखलाही सादर केला. मात्र हरीशला हे मान्य नव्हते. त्याने पोलिसांना हत्येच्या अनुशंगाने तपास करण्याची विनंती केली. यानंतर झालेल्या तपासात हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.