मनसे अध्यक्ष राज ठाकरे जून महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, भाजपा खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध दर्शवला आहे. ‘आधी उत्तर भारतीयांची माफी मागा तरच अयोध्येत पाय ठेवता येईल’ अशी भूमिका बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे. ब्रृजभूषण सिंह यांना आवर घालण्यासाठी साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. ‘ब्रृजभूषण यांना आवरा, राज ठाकरेंना अयोध्याला येऊ द्या’ अशी मागणी कांचनगिरी यांनी केली आहे.

काय आहे नेमका वाद?

जून महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. मात्र, “उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही”, अशी भुमिका भाजपा खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे. बृजभूषण यांच्या विरोधानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. मनसे नेत्यांनीही बृजभूषण यांना आव्हान दिले होते.

कोण आहेत कांचनगिरी?

कांचन गिरी यांचा जन्म झारखंडमधील हजारी वाघ येथे झाला आहे. कांचन गिरी यांचे पूर्वज बिहारमधील आहेत. त्या मागील २५ वर्षांपासून सामाजिक काम करत आहेत. त्यांनी निसर्गाशी निगडीत असणारे आणि सध्याच्या परिस्थितीत सुधारणा हवी अशी कामे केली आहेत. कांचन गिरी यांनी भारतासह परदेशात देखील शेतकऱ्यांसाठी काम केले. गंगा यमुना या नद्यांमध्ये निर्माल्य टाकलं जातं ते साफ-सफाई करण्याची मोहीम कांचनगिरी यांनी हाती घेतली होती. तसेच देशातील इतर मुख्य नद्या सफाई करण्याचे ध्येय हाती घेतले होते. देशात हिंदू धर्माचा प्रसार करण्यासह युरोपीय देशात देखील कांचनगिरी यांनी हिंदू धर्माचा प्रसार केला आहे.