जाट आंदोलनादरम्यान सोनिपतजवळ मुर्थल येथे काही महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याबाबतची कुठलीही तक्रार नोंदवून घेण्यासाठी हरयाणा सरकारने एका पोलीस उपमहानिरीक्षकासह तीन महिला अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे.

या प्रकरणात महिला पोलीस अधिकाऱ्यांची तीन सदस्यीय समिती नेमण्यात आल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव पी. के. दास यांनी शुक्रवारी दिली. पोलीस उपमहानिरीक्षक राजेश्री सिंग, तसेच पोलीस अधीक्षक भारती दबास व सुरिंदर कौर या त्या तीन अधिकारी आहेत.

अशी कुठलीही घटना घडल्याची माहिती असलेली कुणी व्यक्ती असेल, तर तिने अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी राज्य सरकारने १८००१८०२०५७ हा हेल्पलाइन क्रमांकही सुरू केला आहे. या संदर्भात मानवाधिकार आयोगासारख्या वैधानिक संस्थांना सहकार्य करण्यास आपण तयार असल्याचे सांगून, नागरिकांनी पोलिसांना माहिती पुरवावी असे आवाहन दास यांनी केले.

पोलिसांना अशा प्रकारची कुठलीही तक्रार अद्याप मिळालेली नाही, मात्र ती मिळाल्यास पोलीस त्यानुसार त्वरित कार्यवाही करतील, असे हरयाणाचे पोलीस महासंचालक वाय. पी. सिंघल यांनी सांगितले. स्थानिक पोलीस अधिकारी या लैंगिक अत्याचाराची माहिती दडपत असल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले.स्थानिक पोलीस अधिकारी या लैंगिक अत्याचाराची माहिती दडपत असल्याचे वृत्त त्यांनी फेटाळून लावले.