गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल यांने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. लखनौमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या हार्दिक पटेलने सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावरही टीका केली. मी भाजपचा विरोधक नाही. समाजवादी, बसपाचाही विरोध करण्यासाठी मी येथे आलेलो नाही. परंतु मोदींचा मी कायम विरोध करेन. कारण मोदींनी पटेल समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या युवकांना मारहाण केली. यात १३ आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घरात घुसून पटेल समाजातील युवकांना मारहाण केल्याचा आरोप त्याने केला.
लखनौत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बोलावण्यात आलेल्या पंचायतमध्ये हार्दिक पटेल याने समाजाचे कार्ड चालवले. या वेळी त्याने मंडल आयोगाचा उल्लेख करत या आयोगाने केलेल्या उर्वरित शिफारशीही लागू करण्याची मागणी केली. तो म्हणाला, कुर्मी, जाट आणि गुर्जर हे एकाच वंशाचे आहेत. त्यांनी पाय ओढण्याऐवजी आमच्याबरोबर यावे. हृदय परिवर्तनबरोबरच सत्ता बदलेल. यावेळी हार्दिक यांनी मुसलमानांनाही आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले.
हार्दिक पटेल याने या वेळी नोटाबंदीवरही भाष्य केले. नोटाबंदीमुळे काहीच फरक पडणार नसल्याचे सांगत प्रत्येक मनुष्य आणि पक्ष भ्रष्टाचार विरोधात आहे. भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. नोटाबंदीमुळे ग्रामीण भागातील व्यक्ती, शेतकरी अडचणीत आहेत. मोदींच्या मॉडेलने गुजरातला कर्जबाजारी बनवले आहे. येत्या काही दिवसांत देशही कर्जबाजारी बनणार असल्याचा खोचक टोलाही लगावला.
टीव्हीमध्ये गुजरातमधील ग्रामीण भागातही २४ तास वीज असल्याचे सांगतात. परंतु माझे काका पहाटे तीन वाजता शेतात जातात. कारण दिवसा तेथे वीज नसते. त्यामुळे गुजरातमध्ये २४ वीज असते हे वृत्तच चुकीचे आहे, असे त्याने म्हटले. या वेळी राष्ट्रीय महासचिव अखिलेश कटियार, जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष गीता कटियार, भाजपचे स्थानिक नगरसेवक सूरज वर्मा उपस्थित होते.