पटेल समाजाची आरक्षणाच्या मुद्दय़ावर रविवारी सुरू होणार असलेली ‘उलट दांडी यात्रा’ एका आठवडय़ाने लांबणीवर टाकण्याची घोषणा हार्दिक पटेल याने काल केली. तथापि, सरकारने यात्रेला येत्या रविवापर्यंत परवानगी दिली नाही, तर आम्ही निदर्शनांचा कार्यक्रम सुरू ठेवू असा इशाराही त्याने दिला.
आंदोलनामुळे ‘घाबरलेल्या’ सरकारने आम्हाला परवानगी न दिल्यामुळे ६ सप्टेंबरची नियोजित दांडी यात्रा आम्ही १३ सप्टेंबपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र आमच्या मते, हा त्यांचा पराभव आणि आमचा विजय आहे, असे हार्दिकने पत्रकारांना सांगितले. सरकारने परवानगी दिली किंवा नाकारली तरी १३ सप्टेंबरला आम्ही यात्रा काढूच, असे त्याने स्पष्ट केले.
नवसारीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी ही यात्रा काढण्यास परवानगी नाकारतानाच, परिस्थिती हाताळण्यासाठी सुरक्षा दले आणि निमलष्करी दले तैनात केली होती.
आतापर्यंत आम्ही कायद्याचे पालन केले आहे, परंतु त्यांनी पुन्हा परवानगी नाकारली तर आम्ही कायदा पाळणार नाही. अशा वेळी हिंसाचार झाला किंवा कायदा- सुव्यवस्थेचा भंग झाला तर त्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस जबाबदार असतील, असे हार्दिक म्हणाला. राज्य सरकार गुजरातमध्ये जातींची विभागणी करू इच्छिते, असा आरोप त्याने केला. आमचे आंदोलन केवळ पटेल समाजाला आरक्षणासाठी असून आम्ही इतर कुठल्याही समाजाविरुद्ध नसल्याचे त्याने सांगितले.
मी माझ्या ७८ सहकाऱ्यांसह दांडी येथून यात्रा सुरू करणार आहे. जोवर ही यात्रा सुरतला पोहचेल, तोवर ५ लाख लोक आम्हाला सामील झालेले असतील, असे हार्दिकने यापूर्वी सांगितले होते. पटेल समाजाच्या एकतेमुळे घाबरलेल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ लागू केले असल्याचे हार्दिकचा जवळचा सहकारी चिराग पटेल म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik patel postpones reverse dandi yatra
First published on: 08-09-2015 at 01:42 IST