RSS चा उल्लेख करत काँग्रेस नेत्याने सांगितलं रुपाणी यांच्या राजीनाम्याचं ‘मुख्य कारण’, म्हणाले…

पक्षाने गुजरातच्या व्यापक हितासाठी घेतलेल्या निर्णयामुळे मी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे, असे रुपाणी यांनी स्पष्ट केले असले तरी खरे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही

Vijay Rupani Resignation
शनिवारी रुपाणी यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सादर केला (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य : सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

गुजरात विधानसभा निवडणूक एक वर्षावर असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाने गुजरातच्या व्यापक हितासाठी घेतलेल्या निर्णयामुळे मी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे, असे रुपाणी यांनी स्पष्ट केले असले तरी अचानक रुपाणी यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. गुजरात विधानसभा निवडणूक पुढील वर्षी डिसेंबरमध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या गृहराज्यात अचानक घडलेल्या या राजकीय घडमोडीमागील कारण मात्र अस्पष्ट आहे. रुपाणी यांनी डिसेंबर २०१७ मध्ये मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा सूत्रे स्वीकारली होती. मात्र त्यांनी अचानक राजीनामा दिल्याने काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी ट्विटरवरुन भाजपा आणि रुपाणी यांच्यावर निशाणा साधलाय.

मुख्यमंत्री रुपाणी यांना बदलण्याचं मुख्य कारण अशा मथळ्याखाली पटेल यांनी राज्यातील विधानसभेच्या जागांच्या समिकरणांची आकडेमोड सांगितली आहे. “ऑगस्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने केलेल्या गुप्त सर्वेक्षणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. काँग्रेसला ४३ टक्के मतांसहीत ९६ ते १०० जागा आणि भाजपाला ३८ टक्के मतांसहीत ८० ते ८४ जागा, आपला ३ टक्के मतांसहीत ० जागा, एमआयएमला एक टक्के मतांसहीत ० जागा आणि सर्व अपक्षांना १५ टक्के मतांसहीत ४ जागा मिळणार आहेत,” असं पटेल म्हणालेत. मुख्यमंत्री रुपाणी यांचा साजीनामा राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी घेण्यात आल्याचा आरोपही पटेल यांनी केलाय. मात्र त्याचवेळी त्यांनी खरा बदल पुढील वर्षीच्या निवडणुकांमध्ये होणार आहे जेव्हा जनता भाजपाला सत्तेतून बाजूला करेल, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केलाय.


राजीनामा देताना रुपाणी काय म्हणाले?

‘मी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे, असे रुपाणी यांनी, राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन आल्यानंतर पत्रकारांना सांगितले. पक्षाचे राज्यप्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि मनसुख मांडवीय यांच्यासह रुपाणी यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामापत्र सुपूर्द केले. ‘‘पाच वर्षे राज्याची सेवा करण्याची मला संधी देण्यात आली. मी राज्याच्या विकासात योगदान दिले आहे. आता पक्षाच्या आदेशानुसार वाटचाल करेन,’’ असे रुपाणी म्हणाले. माझ्यासारख्या सामान्य कार्यकत्र्याला मुख्यमंत्री म्हणून राज्यातील नागरिकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राजीनामा का या प्रश्नावर रुपाणी म्हणाले…

राजीनामा देण्याचे कारण काय, असे पत्रकारांनी विचारले असता रुपाणी म्हणाले की, भाजपामध्ये हे पक्ष कार्यकर्त्यांसाठी ‘रिले शर्यतीसारखे’ आहे. एक जण दुसऱ्याला बॅटन सोपवत असतो. तुमचा उत्तराधिकारी कोण, असे विचारले असता, ते पक्ष ठरवेल, असे रुपाणी म्हणाले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्याशी आपले कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.नवे मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रुपाणी यांचे उत्तराधिकारी म्हणून गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, कृषिमंत्री आर.सी. फाल्दु, तसेच केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि मनसुख मांडवीय यांची नावे चर्चेत आहेत. ऑगस्ट २०१६ मध्ये आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, तेव्हा नितीन पटेल त्यांची जागा घेतील, अशी चर्चा होती, मात्र त्याऐवजी रुपाणी यांची निवड करण्यात आली  होती.

भाजपाने सहा महिन्यांत पाच  मुख्यमंत्री बदलले

२०१४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यावर कितीही विरोध वा टीका झाली तरीही राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याचे टाळणाऱ्या भाजपाने गेल्या सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलले आहेत. लोकांची नाराजी, पक्षनेतृत्वाचा विश्वास गमाविणे किंवा अकार्यक्षमतेचा ठपका ठेवूनच भाजपाने मुख्यमंत्री बदलले आहेत. उत्तराखंडमध्ये मार्च महिन्यात त्रिवेंद्रसिंह रावत यांना हटवून तिरथसिंह रावत यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. लोकसभा सदस्य असलेल्या रावत यांना सहा महिन्यांच्या मुदतीत विधानसभेवर निवडून येणे शक्य नसल्याने अवघ्या ११४ दिवसांमध्येच रावत यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत उत्तराखंडमध्ये भाजपाने दोन मुख्यमंत्री बदलले.

आसामध्ये गेल्या मे महिन्यात भाजपा पुन्हा सत्तेत येताच सर्वानंद सोनोवाल यांना बदलून भाजपाने हेमंत बिश्वा सरमा यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली होती. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद भूषविताना दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला त्याच दिवशी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना राजीनामा देण्यास पक्षाने भाग पाडले होते. गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका सव्वा वर्षावर येऊन ठेपल्या असताना विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hardik patel tweet about vijay rupani resignation scsg