‘हॅरी पॉटर’ सिनेमातील सर्वात लोकप्रिय अभिनेते रॉबर्ट हार्डी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. रॉबर्ट यांच्या कुटुंबियांनी याबद्दल माहिती दिली. रॉबर्ट यांनी थिएटर, टिव्ही आणि सिनेमांमध्ये ७० वर्षांक्षाही अधिक काळ काम केले.
रॉबर्ट यांनी ‘हॅरी पॉटर’मध्ये कॉरनेलियस फज ही व्यक्तिरेखा साकारली होती. जादूगारांमध्ये ते सर्वोत्कृष्ट असतात. हार्डी यांची मुलं एमा, जस्टिन आणि पॉल यांनी आपल्या वक्तव्यात, बाबा फार चांगले कलाकार होते. त्यांना संगीत फार आवडायचं, तसंच साहित्याबद्दलही त्यांना तीव्र ओढ होती, असं सांगितलं. अभिनयातील त्यांच्या योगदानाबद्दल ‘सीबीई’ पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले.
हार्डी यांनी ६ सिनेमांमध्ये ब्रिटीश पंतप्रधान विंसटन चर्चिल यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. एवढेच नाही तर अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष फ्रँकलिन डी रूसवेल्ट यांची व्यक्तिरेखा साकारली होती.
१९२५ मध्ये जन्मलेल्या हार्डी यांनी दुसऱ्या महायुद्धावेळी रॉयल एअर फोर्समध्ये नोकरी केली होती. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना त्यांची मैत्री रिचर्ड बर्टन यांच्यासोबत झाली. दुसरे महायुद्ध संपल्यावर त्यांनी आपले लक्ष अभिनयाकडे वळवले. १९७८ ते १९९० मध्ये त्यांनी ‘ऑल क्रिएचर्स ग्रेट अॅण्ड स्मॉल’ ही नावाजलेली मालिका केली.