शिवसेनेचे नेत एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. भारतासोबत पाकिस्तानमध्येही शिंदेंच्या नावाची चर्चा सुरु आहे. शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा एकनाथ शिंदेंना असल्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. या सगळ्याच्या मागे भाजपाचाच हात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये एक वेगळी पण गंमतीशीर बातमी समोर आली आहे. भारताच्या एका प्रसिद्ध उद्योगपतींनी शिंदे प्रकरणावरून एक गंमतीशीर फोटो ट्विट केला आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल झाला असून अनेक मजेशीर कमेंट्सही आल्या आहेत.


हे ट्विट भारताचे प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी केलं आहे. गोयंका नेहमीच गंमतीशीर ट्विट किंवा किंवा फोटो शेअर करत असतात. ट्विटमध्ये त्यांनी एकनाथ शिंदे आणि स्वतःचाच फोटो शेयर केला आहे. हर्ष गोयंका आणि एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यात बरेच साम्य आहे. दाडीची ठेवण, चेहऱ्याचा रंग सगळेच सारखे वाटते. गोयंका यांनी ट्विट करत म्हणले आहे “In Guwahati, if anyone wants to reach me” म्हणजे,”मी गुवाहाटीत आहे, कुणाला भेटायचं असेल तर पोहोचा”. गोयंका यांचे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. या ट्विटखाली लोक गंमतीशीर कमेंट्सही करत आहेत.

कोण आहेत हर्ष गोयंका

हर्षवर्धन गोयंका भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत. आरपीजी समुहाचे ते अध्यक्ष आहेत. फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधीशांमध्ये ते ७७ व्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आहेत. सेंट झेवियर्स कॉलेज, कोलकाता येथून त्यांनी अर्थशास्त्रात विषयात पदवी घेतली तसेच टरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटमधून त्यांनी आपलं एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे.