Harshwardhan Sapkal on Narendra Modi’s Speech from Red Fort : स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं. मात्र, यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्षेप घेतला आहे. सपकाळ म्हणाले, “मोदी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लाल किल्ल्यावरून दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. ते आतापर्यंत लाल किल्ल्यावरून खोटं बोलत आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेलं वक्तव्य देखील खोटं असू शकतं.”
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नेमकं योगदान काय होतं हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आजच्या भाषणातून सांगायला हवं होतं. त्यांनी यावर भाष्य केलं असतं तर बरं झालं असतं. भारत स्वातंत्र्यासाठी लढत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि इंग्रजांचा संबंध कसा होता? इंग्रजांकडून पेन्शन घेणारे नेते कोण होते? संघाचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा मृत्यू कसा झाला? पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा खून कोणी केला? यासंबंधी तपास करण्यासाठी संघाने जी सत्यशोधक समिती गठित केली होती, त्या समितीचा अहवाल काय आला होता? महात्मा गांधी यांचा खून करण्यामागे कोणती संघटना होती? हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं.”
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “उंगली काटके भी शहीदो में गिनती नही अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अवस्था आहे, त्या संघाचा देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाशी कवडीचाही संबंध नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाला लाल किल्ल्यावरील भाषणातून पावती देणे हे हास्यास्पद आहे.”
हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले?
“पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून काय भाषण करणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असतं यापूर्वी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ज्या घोषणा करायचे त्या प्रत्यक्षात उतरायच्या. पंतप्रधानांचं प्रत्येक वक्तव्य तंतोतंत खरं सिद्ध व्हायचं. परंतु गेल्या ११ वर्षांपासून पंतप्रधान मोदी केवळ खोटे बोलताना दिसत आहेत. ते दहा वर्षांपासून केवळ खोटं बोलत आहेत. त्यांनी दिलेलं एकही आश्वासन आतापर्यंत पूर्ण केलेलं नाही. त्यामुळे आज त्यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे कौतुक केलं आहे ते देखील खोटं आहे असं मानायला हरकत नाही.”
मोदींचे आरएसएसबद्दल गौरवोद्गार
पंतप्रधान मोदी म्हणाले होते की “१०० वर्षांपूर्वी एक संघटना उदयास आली, तिचं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या संघटनेने स्वतःला मातृभूमीसाठी समर्पित ठेवलं आहे. ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. सेवा, समर्पण, संघटना आणि अतुलनीय शिस्तीद्वारे, आरएसएसने राष्ट्र उभारणीत अद्वितीय भूमिका बजावली आहे. मी लाल किल्ल्यावरुन सर्व संघ स्वयंसेवकांना आणि त्यांच्या कार्याला सलाम करतो.”