हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंग हुड्डा यांच्या अडचणीत शुक्रवारी भर पडली असून सीबीआयने शुक्रवारी दिल्ली आणि लगतच्या भागातील ३० ठिकाणी छापा टाकला. यात हुड्डा यांच्या निवासस्थानाचाही समावेश आहे. भूखंडा घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

हरयाणात २००४ ते २००७ या कालावधीत झालेल्या भूखंड विक्रीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने १ नोव्हेंबर २०१७ रोजी सीबीआयला या प्रकरणात तपासाचे आदेश दिले होते. २००९ ते २०१४ या कालावधीत गुरुग्राममधील १, ४१७ एकर जागेच्या भूसंपादनात गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून या प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. यात हुड्डांसह माजी आयएएस अधिकारी टी सी गुप्ता आणि १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी ३० ठिकाणी छापा देखील टाकला. दिल्ली, गुरुग्राम, चंदीगड आणि मोहाली येथील ३० ठिकाणी छापा टाकण्यात आला असून यात हुड्डा यांच्या निवासस्थानाचाही समावेश आहे.

सीबीआयच्या कारवाईवर हुड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीबीआयने छाप्यादरम्यान शोध घेतला, मात्र त्यांना काहीच सापडलेले नाही. माझा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असून मी अशा कारवाईमुळे गप्प बसणार नाही, असे त्यांनी सांगितले.