Interfaith Marriage Case in Haryana : हरियाणातील चरखी दादरी जिल्ह्यातील पटुवास या गावात रविवारी (२० जुलै) पंचायत भरवण्यात आली होती. या पंचायतीने एका अंतरधर्मीय विवाहित जोडप्याला (मुस्लीम तरुण व हिंदू तरुणी) विभक्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुस्लीम तरुणाच्या कुटुंबावर तीन गावांमध्ये बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे.
चरखी दादरी जिल्ह्यातील महाराणा, खेरी संवल व पटुवास या तीन गावातील रहिवासी या पंचायतीला म्हणजेच बैठकीला उपस्थित होते. शाहिद हा मुस्लीम तरुण व प्रीती नावाच्या हिंदू तरुणीच्या निकाहमुळेळ तिन्ही गावांमध्ये निर्माण झालेल्या तणावावर या बैठकीत सलग चार तास चर्चा झाली. या चर्चेअंती पंचायतीने सदर अंतरधर्मीय जोडप्याला विभक्त करण्याचे आदेश दिले.
कपूरसिंग व धरमपाल हे पटुवास गावाचे प्रमुख (सरपंच) या पंचायतीच्या बैठकीचे अध्यक्ष होते. या बैठकीत आदेश देण्यात आला की शाहिदने आता त्याच्या गावी परत येऊ नये. यावर त्याचे आजोब सहमत असल्याची माहिती धरमपाल यांनी पंचायतीला दिली. दरम्यान, पंचायतीने शाहिदच्या कुटुंबाशी कोणतेही समाजिक संबंध न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या प्रकरणाविषयी धरमपाल म्हणाले, “विभक्त होण्याची प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. ३ जुलै रोजी शाहिद व प्रीती यांचा निकाह (इस्लामिक विवाह सोहळा) पार पडला होता. ६ जुलै रोजी ग्रामस्थांना या निकाहची माहिती मिळाली. तेव्हापासून गावात वाद सुरू झाला. परिणामी गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं. लोकांनी याविरोधात निदर्शने केली. तसेच गावांमधील मुस्लिमांची दुकान जबरदस्तीने बंद केली.
गावात शांतता राखण्यासाठी पोलीस व नेत्यांचे प्रयत्न
दरम्यान, गावात शांतता राखण्यासाठी अनेक चौकांमध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच शाहिदच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्याच्या घराबाहेरही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गावातील तणाव कमी करण्याचे प्रयत्न चालू असून स्थानिक नेते व सरपंच धरमपाल यांच्या नेतृत्वाखाली बैठका घेऊन या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न होत आहे. दरम्यान, शाहिद व प्रीतीने विभक्त होण्याची तयारी दर्शवली आहे. यासंबंधीच्या प्रतिज्ञापत्रांवर दोघांनी स्वाक्षरी केली आहे. काही गावांमध्ये असंतोष होता. त्यामुळेच रविवारी पंचायत भरवण्यात आली होती.