हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या मृत्यूनंतर देशभरात संतापाची लाट असताना एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना धमकावत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार पीडितेच्या वडिलांना सांगत आहेत की, “अर्धी मीडिया आज गेली आहे, उरलेला उद्यापर्यंत गेलेले तुम्हाला दिसतील. फक्त आम्हीच इथे तुमच्यासोबत आहोत. आता आपला जबाब बदलायचा का नाही याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे”.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
यूपी सरकार किसी को पीड़िता के गांव जाने से क्यों रोक रही है उसका जवाब यहां है?
पीड़िता के परिवार को हाथरस डीएम जाकर धमका रहे हैं।
न मीडिया जा पायेगा, न हम लोग तो यूपी सरकार पीड़िता के परिवार को खुलकर धमका पाएगी।
ये लोग अत्याचारी हैं। pic.twitter.com/RDV2jrQfRn
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 1, 2020
इंडिया टुडेने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना यासंबंधी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. उत्तर प्रदेश पोलीस आणि हाथरस जिल्हा प्रशासनाने ज्या पद्धतीने संपूर्ण घटना हाताळली आहे त्यावरुन देशभरात उद्रेक आहे. पोलिसांनी पीडितेच्या पार्थिवावर बळजबरी अंत्यसंस्कार केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ज्या व्यक्तीने अंत्यसंस्कार केले त्याचं नाव जाहीर करु शकत नाही असं सांगितलं आहे. ज्या रुग्णवाहिकेतून पार्थिव नेलं जात होतं तिला काही स्थानिक महिलांनी अडवलं होतं, तसंच अंत्यसंस्कार झाले तेव्हा पीडितेचा भाऊ तिथे उपस्थित होता असा दावा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी केला आहे.
आणखी वाचा- Hathras Case : “सफदरजंग रुग्णालयातील नंबर प्लेट नसलेल्या ‘त्या’ रुग्णवाहिकेचे रहस्य काय?”
पीडितेच्या वडिलांनी कुटुंबातील कोणत्याही सदस्याला घराबाहेर जाऊ दिलं जात नसल्याचा आरोप केला असून पोलिसांनी बळजबरीने जबाब घेत त्यावर स्वाक्षरी करुन घेतल्याचं म्हटलं आहे.
बलात्कार झालाच नाही
दरम्यान हाथरस पीडित तरुणीवर बलात्कार झालेला नसल्याचे न्यायवैद्यक अहवालातून स्पष्ट झाल्याचा दावा गुरुवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी केला. यामुळे देशभर पडसाद उमटत असलेल्या या प्रकरणात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. हाथरस पीडित तरुणीवर १४ सप्टेंबर रोजी चार जणांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित तरुणीचा मंगळवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला.
आणखी वाचा- Hathras Case: पीडितेच्या शवविच्छेदन अहवालात बलात्काराचा उल्लेखच नाही
‘‘गळ्याजवळ झालेली दुखापत आणि त्यामुळे झालेल्या मानसिक आघातामुळे हाथरसच्या पीडितेचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटलं आहे. तसंच तपासणी केलेल्या नमुन्यांमध्ये शुक्राणू आढळले नसल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पीडित तरुणीवर बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार झालेला नसल्याचे स्पष्ट होतं’’, असा दावा अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी केला. पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबानीत बलात्काराचा उल्लेख केलेला नसून, केवळ मारहाण (मारपीट) झाल्याचे सांगितले, असं प्रशांत कुमार म्हणाले.
“सामाजिक सलोखा बिघडविण्याबरोबरच जातीय हिंसाचार घडविण्यासाठी काही जणांनी वस्तुस्थितीचा विपर्यास केला, असेही प्रशांत कुमार यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने पावले उचलली असून, सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची ओळख पटविण्यात येत असल्याचं,” प्रशांत कुमार म्हणाले. “हाथरस प्रकरणातील आरोपींवर कारवाई होईलच. मात्र, वैद्यकीय अहवाल येण्याआधीच काहींनी सरकार आणि पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्य़ांबाबत सरकार आणि पोलीस संवेदनशील असल्याचंही,” प्रशांत कुमार यांनी नमूद केले.