उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाची देशभरामध्ये चर्चा आहे. या प्रकरणामधील पीडित तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. पीडित तरुणी १४ सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. चौघांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या तरुणीच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशमधील वातावरण चांगलेच तापले असून आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेबद्दलही संक्षय व्यक्त केला जात आहे. मध्यरात्री ३ वाजता पीडित तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पीडितेच्या कुटुंबाने उत्तर प्रदेश पोलिसांनी जबरदस्ती अंत्यसंस्कार केल्याचा आरोप केला आहे.
पार्थिव घरी आणला जावा यासाठी पोलिसांकडे वारंवार विनंती केली जात होती, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप कुटुंबाने केला आहे. पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबियांना घरात कोंडून तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले जात आहे. पीडितेच्या वडिलांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार आम्ही या अंत्यसंस्काराला विरोध करत असतानाही तिच्यावर पोलिसांनी अंत्यसंस्कार केले. हिंदू संस्कृतीमधील परंपरेनुसार आम्हाला मुलीवर अंत्यसंस्कार करायचे होते. त्यामुळेच आम्ही दिवसा अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली होती. आमच्या सर्व नातेवाईकांनी मुलीच्या अंत्यस्कारामध्ये सहभागी होऊन तिचे अंत्यदर्शन घ्यायचे होते. मात्र आमच्या मुलीचा मृतदेह पोलीस बळजबरीने घेऊन गेले. आमच्यापैकी कोणालाही तिच्या पार्थिवाजवळ जाऊ दिले नाही. आमच्यापैकी कोणीच तिच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झालं नाही. मला माझ्या मुलीचे अंत्यदर्शनही पोलिसांनी करु दिले नाही. अंत्यसंस्काराआधी मला तिचा चेहराही पाहता आला नाही, असं मुलीचे वडील रडतच सांगत होते.
Hathras Gangrape : ‘ओढणी गळ्यात टाकून तिला खेचत नेलं आणि…’; जाणून घ्या १४ सप्टेंबरला नक्की काय घडलंhttps://t.co/DneVqdPe9P
मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली#Hathras #HathrasCase #HathrasPolice— LoksattaLive (@LoksattaLive) September 30, 2020
दुसरीकडे या मुलीच्या आईच्या डोळ्यातील पाणी सरता सरत नाही असं चित्र आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार ही महिला आपल्या मुलीबरोबर शेतात गवत आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी चार ते पाच मुलांनी तिच्या मुलीला बाजरीच्या शेतामध्ये खेचत नेलं आणि तिथेच तिच्यावर अत्याचार केला. मला जेव्हा माझी मुलगी सापडली तेव्हा ती बोलू शकत नव्हती, असंही या महिलेने सांगितलं. पोलिसांनी त्यावेळी आरोपींविरोधात कारवाई केली नाही असा आरोपही पीडितेच्या आईने केला आहे.
पोलिसांनी मात्र पीडितेच्या कुटुंबियांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. कुटुंबाच्या परवानगीनंतरच आम्ही अंत्यसंस्कार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पीडितेच्या कुटुंबातील सर्वजण यामध्ये सहभागी झाले होते असं पोलिसांनी म्हटलं आहे. जिल्हाधिकारी प्रवीण कुमार लक्सर यांनी प्रसारमाध्यमांवर टीका करत सर्व बातम्या चुकीचे असल्याचे म्हटले आहे. कुटुंबाच्या परवानगीनंतरच अंत्यसंस्कार करण्यात आले आणि कुटुंबिय सहभागी झाले होते असं जिल्हाधिकारी म्हणाले आहेत.
