केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या आजीसारखं दिसत असल्याने सत्ता मिळणार असं होत नाही असा टोला केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी लगावला आहे. प्रियंका गांधी यांची चेहरापट्टी इंदिरा गांधीसारखी असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यांना पाहून इंदिरा गांधींची आठवण येते असं अनेक काँग्रेस नेते सांगतात.

‘काँग्रेसमध्ये चर्चा आहे की, प्रियंका गांधींचं नाक हे अगदी त्यांच्या आजी इंदिरा गांधींसारखं आहे’, असं मांडविया यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी, ‘जर आजीसारखं नाक आहे म्हणून सत्ता मिळत असती, तर मग चीनमधील प्रत्येक घरात अध्यक्ष नसता का ?’, असा सवाल विचारला आहे. गुजरातमध्ये आयोजित विजय संकल्प रॅलीत ते बोलत होते.

काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी उघडपणे प्रियंका गांधींना पाहून इंदिरा गांधींची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे. यावर प्रियंका गांधी यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. अनेकांचं माजी पंतप्रधान इंदिरा गांधींवर प्रेम असल्याने त्यांच्याशी माझा संबंध जोडतात असं त्यांनी सांगितलं होतं. भाजपाच्या अनेक नेत्यांनी प्रियंका गांधींवर अशा पद्धतीने टीका केली आहे. भाजपा खासदार हरिश द्विवेदी यांनी गेल्या महिन्यात प्रियंका गांधीवर टीका करताना दिल्लीत त्या जीन्स, टॉप घालतात आणि प्रचारादरम्यान साडी नेसतात असं म्हटलं होतं.