पीटीआय, नवी दिल्ली

राजीव गांधी फाऊंडेशन (आरजीएफ) आणि राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (आरजीसीटी) या दोन संस्थांचा विदेशी योगदान नियमन कायद्यांतर्गत असलेला परवाना केंद्रीय गृहमंत्रालयाने रद्द केला आहे. काँग्रेसच्या मावळत्या अध्यक्ष सोनिया गांधी या दोन्ही संस्थांच्या प्रमुख आहेत. कायद्यांच्या कथित उल्लंघन प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

‘आरजीएफ’ आणि ‘आरजीसीटी’ या दोन संस्थांसह इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या संस्थेविरोधात जुलै २०२० मध्ये केंद्र सरकारने चौकशी सुरू केली होती. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नेतृत्वाखाली आंतरमंत्रालयीन तपास समिती नेमली होती. यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), गृह आणि काँग्रेसशी संबंधित संस्थांवर कारवाई अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. समितीने प्राप्तिकर परताव्यासह अन्य कागदपत्रांची छाननी केल्यानंतर काढलेल्या निष्कर्षांच्या आधारे दोन्ही संस्थांचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली.

या संस्थांमध्ये निधीचा गैरवापर आणि अफरातफरी होत असल्याचा आरोप भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी केला होता. २००५ ते २००९ या काळात देशहित नसलेला अभ्यास करण्यासाठी या संस्थांना चीनकडून निधी मिळाल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच पंतप्रधान मदतनिधीतून या विश्वस्त संस्थांकडे रक्कम वळवल्याचा आरोपही नड्डा यांनी केला होता.

सोनिया गांधी दोन्ही संस्थांच्या अध्यक्ष असून, ‘आरजीएफ’मध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, माँटेकसिंह अहलुवालिया, सुमन दुबे आणि अशोक गांगुली विश्वस्त आहेत. ‘आरजीसीटी’ या संस्थेमध्ये राहुल गांधी, अशोक गांगुली, बन्सी मेहता आणि दीप जोशी विश्वस्त आहेत.

संस्थांविषयी..
राजीव गांधी फाऊंडेशनची स्थापना १९९१ साली झाली. ही संस्था आरोग्य, विज्ञान, महिला व बालकल्याण आदी विषयांवर २००९पर्यंत काम करत होती. तसेच शिक्षणक्षेत्रातही तिचे योगदान असल्याची माहिती संकेतस्थळावर आहे. राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना २००२ साली झाली. ग्रामीण भागातील सुविधांवर ही संस्था काम करते. प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या ग्रामीण भागात राजीव गांधी महिला विकास योजना आणि इंदिरा गांधी नेत्र रुग्णालय आणि संशोधनकेंद्र या उपसंस्थांच्या माध्यमातून काम करण्यात आले आहे. या दोन्ही संस्थांची मुख्यालये दिल्लीतील राजेंद्र प्रसाद मार्गावरील ‘जवाहर भवन’ इथे आहेत.

काँग्रेसच्या दोन संस्थांचा परवाना रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. या निर्णयामुळे या संस्थांमध्ये असलेला भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आला आहे. सोनिया गांधी घटनाबाह्य पद्धतीने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आणि संस्था चालवत होत्या. – संबित पात्रा, प्रवक्ते, भाजप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजीव गांधी फाऊंडेशनने आपल्या देणग्यांची माहिती जाहीर केली आहे. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या संस्था असे करतील का? संघाला परदेशी व्यक्ती, संस्था आणि सरकारांकडून मिळणारा निधी जाहीर करण्यास भाजप सांगेल का? – काँग्रेस