प्रचारात सहभागी होण्याची शक्यता कमीच

निवडणूक प्रचारसभेदरम्यान लिफ्ट कोसळून जखमी झालेला पाकिस्तानचा माजी कसोटीपटू आणि राजकीय नेता इम्रान खान याची प्रकृती आता स्थिर असून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

एका जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर जाताना फोर्कलिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत इम्रान खान आणि त्याचे तीन अंगरक्षक जखमी झाले. इम्रान खान याच्या डोक्याला आणि पाठीला मार लागला. खान याला तातडीने शौकत खानूम रुग्णालयात हलविण्यात आले.

रुग्णालयात इम्रान खान याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर अहोरात्र लक्ष ठेवून आहेत. आता खान याची प्रकृती सुधारत असल्याचे त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर फैझल सुलतान यांनी सांगितले. आणखी किमान दोन दिवस खान याला पूर्ण विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

पाकिस्तान लष्करातील वैद्यकीय तज्ज्ञांनीही इम्रान खान याची तपासणी केली आहे. डाव्या बाजूच्या तिसऱ्या बरगडीला किंचित फ्रॅक्चर झाले आहे. खान याच्यासमवेत जखमी झालेल्या तीन अंगरक्षकांपैकी दोन जणांना उपचार करून घरी पाठविण्यात आले तर तिसऱ्यावर अद्याप उपचार सुरू आहेत.

जनतेला आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इम्रान खान हे तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते असून अपघातापूर्वी त्याने घेतलेल्या जाहीर सभांना जनतेने अलोट गर्दी केली होती. मात्र आता त्यांना प्रचारात सहभागी होता येणार नाही. गुरुवारी प्रचाराची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे खान याने रुग्णालयातूनच जनतेला आपल्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले.