पीटीआय, नवी दिल्ली : केरळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अपात्र ठरवण्यात आलेले खासदार मोहम्मद फैजल यांच्या लोकसभा सचिवालयाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. फैजल यांना एका गुन्ह्यात १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर ते खासदार म्हणून अपात्र ठरले होते. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या निकालाला आणि शिक्षेला स्थगिती दिल्यानंतरही लोकसभा सचिवालयाने त्यांच्यावरील कारवाई रद्द केली नाही. याविरोधात फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्यावर सोमवारी सुनावणी झाली.
ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी फैजल यांची बाजू सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी एस नरसिंह आणि न्या. जे बी पारडीवाला यांच्या खंडपीठासमोर मांडली. केरळ उच्च न्यायालयाच्या निकालानंतर फैजल यांनी लोकसभा सचिवालयाकडे अपात्रतेची कारवाई रद्द करावी यासाठी अनेकदा विनंती केली. मात्र सचिवालयाने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे फैजल यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होता आले नाही. असे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.