तुम्हाला गिफ्ट मिळालेल्या रेडिओचा स्फोट झाला तर? ऐकून कदाचित आश्चर्य वाटू शकेल. पण अशीच एक घटना राजस्थानातल्या उदयपूरमध्ये घडली आहे. एवढंच नाही तर रेडिओच्या या स्फोटात या माणसाचा मृत्यूही झाला आहे. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीनं दिलेल्या बातमीनुसार राजस्थानातल्या उदयपूरमध्ये देवीलाल नावाचा एक माणूस गडिया देवरा भागात राहात होता. तो एक कार मॅकेनिक होता, त्याची पत्नी ड्राय क्लिनिंगचं दुकान चालवत होती.

देवीलाल कामावरून घरी आला, त्यानं टीव्ही लावला पण टीव्ही लागत नव्हता तेव्हा त्याला लक्षात आलं की वर्षभरापूर्वी त्याला एक रेडिओ गिफ्ट मिळाला आहे. मग त्याला वाटलं की टीव्ही बिघडला आहे गिफ्ट मिळालेला रेडिओ त्यानं उघडला आणि सुरू केला. सुरू करताच एक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की देवीलालच्या घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीच्या काचाही फुटल्या. हा आवाज ऐकून देवीलालची पत्नी धावत आली, तसंच देवीलालचे शेजारीही तिथे पोहचले.

देवीलालच्या छातीचं, खांद्याचं आणि चेहऱ्याचं मांस बाहेर आलं होतं. जखमी अवस्थेतच त्याला रूग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही बातमी पोलिसांना समजातच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या एका पथकाकडून आता हा शोध घेतला जातो आहे की रेडिओत नेमकं काय होतं? ज्याचा एवढा भीषण स्फोट झाला. स्फोट झाल्यानं एफएसएलच्या टीमला बोलावण्यात आलं. एफएसएलच्या टीमला घटनास्थळी स्फोटकांचे कोणतेच अंश मिळाले नाहीत. पोलीस अधिकारी या प्रकरणाचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पूर्ण तपास झाल्यावरच आम्ही पूर्ण माहिती देऊ असं पोलिसांनी म्हटलं आहे.