एपी, देर अल-बला (गाझा पट्टी)
इस्रायली लष्कराने गाझाच्या सर्वात मोठय़ा शिफा या रुग्णालयाला वेढा घातला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, यामुळे अखेरच्या विद्युत जनित्रातील इंधन संपल्याने मुदतपूर्व जन्मलेल्या अर्भकासह पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शिफा रुग्णालयास ‘हमास’च्या दहशतवाद्यांनी मुख्य केंद्र बनवल्याचा दावा इस्रायलने केला आहे. हे दहशतवादी तेथील नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करीत आहेत. तसेच या रुग्णालयाखाली त्यांनी भुयारी अड्डे (बंकर) केले आहेत, असेही इस्रायलचे म्हणणे आहे.
शिफा रुग्णालयाचे संचालक मोहम्मद अबू सेल्मिया यांनी सांगितले, की गेल्या काही दिवसांत उत्तर गाझा युद्धक्षेत्रातील शिफा आणि इतर रुग्णालयांजवळ तीव्र संघर्ष सुरू आहे. त्यामुळे जीवनावश्यक गोष्टींचा साठा संपत आला आहे. येथे वीजपुरवठा ठप्प आहे. उपचार करण्याची उपकरणेही बंद पडली आहेत. वैद्यकीय उपकरणे बंद पडल्याने रुग्ण, विशेषत: अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे.
अबू सेल्मिया यांनी सांगितले, की इस्रायली सैनिक रुग्णालयाच्या बाहेर किंवा आत कोणावरही गोळीबार करत होते. त्यांनी या परिसरातील इमारतींमधील वावर रोखला होता. फक्त इस्रायली सैनिकांनीच गोळीबार केला का, याला दुजोरा मिळू शकला नाही. शिफा रुग्णालयाच्या आवारात इस्रायली सैनिकांनी केलेल्या गोळीबाराबाबत विचारले असता, इस्रायली लष्कराचे प्रवक्ते पीटर लर्नर यांनी फक्त एवढेच सांगितले, की या परिसरात ‘हमास’विरुद्ध चालू असलेल्या तीव्र संघर्षांत सैनिक गुंतले आहेत. सामान्य नागरिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी लष्कराकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे.
हेही वाचा >>>मृत्यू, काहीजण बेशुद्ध तर अनेकजण जखमी, सुरत रेल्वेस्थानकावर धक्कादायक प्रकार
आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते मेधत अब्बार यांनी सांगितले, की जनित्रे बंद असल्याने पाच रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. त्यात एका अकाली जन्मलेल्या अर्भकाचाही समावेश आहे. या रुग्णालयात ३७ अर्भकांवर उपचार सुरू होते. इस्रायल नागरिकांना बाहेर पडण्यासाठी दक्षिणेकडील मुख्य रस्ता दररोज काही तासांसाठी खुला करत आहे. शनिवारी, सैन्याने प्रथमच स्थलांतर सुलभ करण्यासाठी अल्पकालीन युद्धविराम जाहीर केला.इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतन्याहू म्हणाले की, नागरिकांच्या कोणत्याही नुकसानास ‘हमास’च जबाबदार आहे. दहशतवादी गट ‘हमास’ गाझामधील नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करत असल्याच्या आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केला.
युद्धात ११ हजारांवर पॅलेस्टिनी नागरिक मृत्युमुखी
‘हमास’ने इस्रायलवर चढवलेल्या हल्ल्यात सुमारे १२०० इस्रायली नागरिक ठार आहेत. तर, इस्रायलने प्रत्युत्तरादाखल चढवलेल्या हल्ल्यात गाझा येथील ११ हजारांवर पॅलेस्टिनी नागरिक मृत्युमुखी पडले. त्यात प्रामुख्याने नागरिक असून मुलांची संख्या लक्षणीय असल्याची माहिती ‘हमास’ संचालित सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.