केरळमधील पूरपरिस्थिती आटोक्यात येत असताना आता उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. उत्तराखंडमध्ये झालेल्या विक्रमी पावसामुळे अनेक भागांना भयानक पुराचा कहर सहन करावा लागला आहे. यामध्ये ३४ लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. हवामान खात्याच्या मते, १८ ऑक्टोबर ते १९ऑक्टोबर दरम्यान कुमाऊ प्रदेशात इतिहासातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी बातचीत केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडून राज्यातील मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.

“पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि मंत्री अजय भट्ट यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांनी राज्यात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला,” असे सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले. दरम्यान, राज्यात मुसळधार पाऊस आणि पुर-परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमित सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तत्पूर्वी, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अतिवृष्टीच्या परिस्थितीबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. ते राज्याच्या सचिवालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील विभक्त ठिकाणी अतिवृष्टीसह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून बद्रीनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे आणि बद्रीनाथकडे जाणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आले आहे.

एनडीआरएफच्या १५ टीम तैनात

उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्ती पाहता एनडीआरएफच्या १५ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. उधम सिंह नगरमध्ये आतापर्यंत ३०० लोकांना वाचवण्यात आले आहे.