तब्बल १२ वर्षांनंतर जपानने हिमवृष्टी अनुभवल्याच्या वृत्तास आठवडाही उलटत नाही तोच, जपानला हिमवादळाचा जबरी तडाखा बसला. या वादळामुळे, देशातील वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे कोलमडली असून किमान १९ जण ठार झाले आहेत. प्रसारमाध्यमे आणि जपानी सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिमवादळामुळे सुमारे १६०० जणांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे.
जपानच्या उत्तरेकडे असलेल्या शहरांना रविवारपासून हिमवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली. सुरुवातीस सौम्य वाटणाऱ्या हिमवर्षांवाने सोमवारी मात्र रौद्ररूप धारण केले. या हिमप्रपातामुळे, होक्काईदो शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. याच भागात राहणारे सुमारे सात हजार लोक यामुळे अडकून पडले. त्यांना मदत पोहोचविणेही अशक्य होऊन बसले.
टोकियोच्या पश्चिमेकडील भागात अन्नाचा तीव्र तुटवडा भासत आहे. जिथे हिमवादळाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे अशा भागात लवकरच सरकारतर्फे मदतकार्य करणारे चमू पाठविण्यात येतील, अशी माहिती पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांनी दिली.
जपानवरील हे संकट अद्याप ओसरले नसून येत्या ४८ तासांत ईशान्य जपानला अशाच स्वरूपाच्या वादळांचा आणखी तडाखा बसू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सोमवारच्या वादळामुळे, अनेक वाहने रस्त्यांतच अडकून पडली असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १८ पूर्णपणे ठप्प झाला आहे. रस्त्यांवर सुमारे २६ सेंटिमीटर उंचीचे बर्फाचे थर जमा झाल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या वादळात किमान १९ जणांना आपले प्राण गमवावे लागले असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे योमिउरी शिंबुन या आघाडीच्या वृत्तपत्राने म्हटले आहे.