गेल्या मंगळवारपासून निसर्गाचा प्रकोप झेलणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये आज पाऊस थांबून स्वच्छ सूर्यदर्शन झाले. श्रीनगर, बारामुल्ला तसेच जम्मू विभागातही पाणी ओसरू लागले आहे. या पाश्र्वभूमीवर लष्कर व एनडीआरएफने मदतीचा वेग वाढवला असून सुमारे ५० हजार नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आली. काश्मीर खोऱ्याशी रस्ते तसेच दूरसंचार संपर्क स्थापित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तर आपत्तीग्रस्तांसाठी मदतसाहित्य तसेच लष्कराचे जवान यांची वाहतूक करण्यासाठी हवाईदलाची विमाने आणि हेलिकॉप्टर रात्रंदिवस उड्डाण करीत आहेत.
गेल्या सुमारे सहा दशकांतील सगळ्यात प्रलयंकारी अशा या पुरात सुमारे २०० जणांचे बळी गेले आहेत. मात्र पावसाचा मारा कालपासून कमी झाला. तर आज स्वच्छ सूर्यप्रकाश पडला. त्याचबरोबर श्रीनगर, बारामुल्ला आदी शहरांमध्ये पाण्याची पातळी झपाटय़ाने कमी झाली. मात्र श्रीनगरमधील उत्तरेकडील भागात पाण्याची पातळी वाढत आहे. तसेच जगप्रसिद्ध दाल लेकमधील पाणीही वाढून ते हजरतबल मशिदीच्या परिसरात शिरल्याचे सांगण्यात आले.
काश्मीर खोरे तसेच जम्मू विभागातील पूरग्रस्तांसाठी लष्कराने प्रचंड मोठी मदत व बचाव मोहीम हाती घेतली आहे. काल रात्रीपासून हवाईदलाच्या ६१ विमाने व हेलिकॉप्टरनी ३५४ फेऱ्या मारून मोठय़ा प्रमाणावर मदतसामग्री तसेच लष्कराच्या जवानांना आपत्तीग्रस्त भागात पोहोचवण्यात मोठी भूमिका पार पाडली. लष्कराने पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे ५० हजार नागरिकांची सुटका आजवर केली आहे. मदतकार्यात लष्कराच्या ११० तर एनडीआरएफच्या १४८ बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. आजघडीला पूरग्रस्त भागात सुमारे एक लाख जवान काम करीत आहेत, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.
दरम्यान, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग तसेच बीएसएनएलचे नेटवर्क ही काश्मीर खोऱ्याला जोडणारी दोन मुख्य संपर्कसाधने दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेण्यात आली आहे. श्रीनगर-लेह महामार्गाची दुरुस्ती लष्कराच्या अभियांत्रिकी विभागाने केली असून त्यामार्गाने श्रीनगरशी संपर्क स्थापन झाला आहे.
लष्कराने आता श्रीनगर शहर तसेच दक्षिण काश्मीर परिसरावर लक्ष केंद्रित केले आहे. श्रीनगरच्या राजबाग, इंद्रनगर, शिवपुरा, जवाहर नगर या वस्त्यांमध्ये अद्याप पुराचे पाणी साचले असून तेथे अनेकजण अडकले आहेत.
दरम्यान, पवनहंससह अनेक खासगी विमान कंपन्यांनी मदतकार्यासाठी आपली हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Helping hand to victims of the kashmir floods
First published on: 10-09-2014 at 01:19 IST