२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात गुप्तचर खात्याने हाय अलर्ट जाहीर केला आहे. दिल्लीतील जामा मशिद परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यामुळे हा हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. याबरोबरच देशातील इतर प्रमुख शहरातही हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी २६ जानेवारीच्या हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याच्या आरोपाखाली बिलाल अहमद कावा याला शुक्रवारी अटक केली होती. त्या पार्श्वभूमीवर हा इशारा महत्वाचा मानला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात ठिकठिकाणी विशेष सुरक्षा व्यवस्था असते. परंतु, दिल्लीतील जामा मशिद परिसरात तीन संशयित दहशतवादी लपले असून ते प्रजासत्ताक दिनी घातपात घडवण्याची शक्यता गुप्तचर खात्याने वर्तवली असल्याने हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, जामा मशिद परिसरात तीन संशयित लपल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. हे संशयित दहशतवादी मोठ्या घातपाताच्या तयारीत असून ते अफगाणिस्तानचे असल्याचेही गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट केलं आहे. काश्मीरच्या पुलवामामधून त्यांना विविध प्रकारच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाला कोणतीही वाईट घटना घडू नये यादृष्टीने हा हाय अलर्ट देण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांसह इतर तपास यंत्रणाही या घटनेकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.

प्रजासत्ताक दिनाला दिल्लीमध्ये राजपथावर मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले असते. यामध्ये भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे क्षेपणास्त्रे यांच्याबरोबर संचलन करतात. राष्ट्रपतींना तिन्ही सैन्यदलांकडून मानवंदना दिली जाते. या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यामुळे दिल्लीत कोणतीही अघटीत घटना घडू नये या दृष्टीने हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: High alert in india 3 terrorist entered in delhi 26 january republic day
First published on: 14-01-2018 at 13:01 IST