बंगळूरु, नवी दिल्ली : कर्नाटकात हिजाब प्रकरण मंगळवारी आणखी चिघळल़े  राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबविरोधातील निदर्शने तीव्र झाली असून, त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत आहेत़  यामुळे शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने मंगळवारी घेतला़

उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनींना गेल्या आठवडय़ात प्रवेश नाकारण्यात आल्यापासून या वादाला तोंड फुटल़े  उडुपीबरोबरच शिवमोगा, गलकोटबरोबरच राज्याच्या अन्य भागांतील शैक्षणिक संस्थांमध्ये मंगळवारी हिजाबविरोधात निदर्शने करण्यात आली़

मंडय़ा येथील ‘पीईएस’ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थीनीला निदर्शकांनी घेरण्याचा प्रयत्न केला़  या झुंडगिरीची चित्रफीत मंगळवारी समाजमाध्यमांवर मोठय़ा प्रमाणावर पसरली़ 

शैक्षणिक संस्थांमध्ये तणाव वाढू लागल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला़  कोणीही चिथावणीजनक विधाने करू नये, शांतता राखावी, असे आवाहन बोम्मई यांनी केल़े  विद्याथ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हव़े  तसेच शिक्षकांबरोबरच व्यवस्थापनाने आपल्या संकुलात शांतता अबाधित राहील, याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही बोम्मई यांनी केली़

हिजाब वादाद्वारे भाजप धार्मिक ध्रुवीकरण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आह़े  मात्र, बोम्मई यांनी हा आरोप निराधार असल्याचे म्हटले आह़े  राज्य सरकारने गणवेश संहिता निश्चित केली असून, त्याचे पालन केले जात़े हीच भूमिमका न्यायालयात मांडल्याचे बोम्मई यांनी सांगितल़े

उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी

काही टवाळखोर लोक हिजाब प्रकरण तापवत आहेत, असे निरीक्षण कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवल़े  या प्रकरणावर आज, बुधवारीही सुनावणी होणार आह़े  हिजाब परिधान करणे हा धर्माचरणाचा मूलभूत हक्क असल्याचे नमूद करत त्यास वैध ठरविण्याची मागणी काही याचिकाकत्यांनी केली आह़े  त्यावर न्यायमूर्ती कृष्णा एस़  दिक्षित यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली़  शैक्षणिक संकुलात या मुद्यावरून निदर्शने, घोषणाबाजी योग्य नाही़  राज्यघटनेवर विश्वास ठेवा, अशा शब्दांत सुनावताना पुन्हा बुधवारी सुनावणी घेणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केल़े

पोलीस बळ वापरण्याची वेळ आणू नका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंगळूरु : कर्नाटकच्या विविध भागांत हिजाबच्या समर्थनार्थ आणि विरोधात विद्यार्थ्यांचे गट आक्रमक झाल्याने राज्याचे गृहमंत्री अर्गा ज्ञानेंद्र यांनी शांततेचे आवाहन केले असून, पोलिसांचे बळ वापरण्याची वेळ आणू नका, असा इशाराही दिला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भवितव्याचा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला आह़े