अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होण्याच्या इच्छेने हिलरी क्लिंटन यांनी आपल्या उमेदवारीसाठीच्या प्रयत्नांची घोषणा केली आहे. भारत आणि अमेरिकेमध्ये मजबूत संबंधांच्या पुरस्कर्त्यां असलेल्या क्लिंटन यांना अमेरिकेतील भारतीयांचा मोठा पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे.
‘मी अध्यक्षपदासाठी लढणार आहे. अमेरिकेला नेहमी एका कैवाऱ्याची (चँपियन) आवश्यकता असते आणि मी ती कैवारी बनू इच्छिते’, असे माजी परराष्ट्र मंत्री असलेल्या आणि डेमॉक्रॅटिक पक्षाच्या प्रबळ दावेदार ठरत असलेल्या हिलरी क्लिंटन यांनी सांगितले. ही घोषणा त्यांनी सर्वप्रथम एका व्हिडीओसह ट्विटरवर आणि नंतर आपल्या समर्थकांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये केली. माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी असलेल्या ६७ वर्षे वयाच्या हिलरी या २००८ साली अध्यक्षपदाची निवडणूक लढवून बराक ओबामा यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. २००१ ते २००९ या कालावधीत त्यांनी अमेरिकन सिनेटमध्ये न्यूयॉर्कचे प्रतिनिधित्व केले होते.
ट्विटरवरील व्हिडीओमध्ये क्लिंटन यांनी अमेरिकेचे लोक आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याकरता नेहमीसाठी कैवारी बनण्याचे वचन दिले आहे. आपली मोहीम ही स्वत:ची नसून मतदारांची असल्याचे सांगून, तसेच ‘आता तुमची वेळ आहे’ असे सांगून त्यांनी लोकांना आपल्या प्रचारमोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या व्हिडीओमध्ये मध्यमवर्गीय अमेरिकी कुटुंब त्यांच्या रोजच्या जीवनाबाबत बोलताना, तसेच पुढील काळासाठीची नियोजन करताना दाखवले आहेत.  
अमेरिकी लोकांनी कठीण आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढला आहे, परंतु ज्यात तुम्ही गरजेपुरते मिळवता त्याहून अधिक मिळवू शकाल अशा अर्थव्यवस्थेची गरज आहे, असेही हिलरी यांनी म्हटले आहे.
हिलरी क्लिंटन यांच्या या घोषणेमुळे भारतीय अमेरिकी लोकांमध्ये उत्साह पसरला आहे. आपल्या प्रचार मोहिमेत त्या अनेक भारतीय अमेरिकन लोकांना सहभागी करण्याची अपेक्षा असून, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी नेते आणि माजी सरकारी अधिकारी त्यांना नोव्हेंबर २०१६ मध्ये व्हाईट हाऊससाठी होणारी स्पर्धा जिंकण्याकरता मदत करू शकतील. अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा हे क्लिंटन यांच्या जवळचे मानले जातात आणि त्या निवडून आल्यास वर्मा यांना त्यांच्या प्रशासनात उच्च पद मिळणे अपेक्षित राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hillary clinton announces bid for 2016 presidential election
First published on: 14-04-2015 at 12:11 IST