उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद शहराचे नाव बदलून प्रयागराज केल्यानंतर आता हिमाचल प्रदेश सरकार राज्याची राजधानी असलेल्या शिमला या शहराचेही नाव बदलणार असल्याची दाट शक्यता आहे. नाव बदलण्याच्या मागणीबाबत येथील सरकार जनतेच्या भावना जाणून घेणार असल्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीर केले आहे. शिमला या शहराचं नाव बदलून ‘श्यामला’ असं केलं जाणार असल्याची माहिती आहे. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत संकेत दिले आहेत. याशिवाय शहरातील, रिज, स्कँडल पॉईंट, पीटरहॉप, डलहौसी, व्हॉईसराय गिल अॅडव्हान्स स्टडी या ठिकाणांची नावंही बदलण्यात येणार असल्याची माहिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून  विश्व हिंदू परिषद शिमला शहराचे नाव बदलण्याबाबत मागणी  करत आहे. मात्र 2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी शिमला हे नाव जगभर प्रसिद्ध असल्याचे सांगत ती मागणी फेटाळली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपा नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री विपिन सिंह परमार म्हणाले की, देशातील विविध क्षेत्रांची नावं पौराणिक होती. तीच नावं पुन्हा ठेवण्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये. शिमलाचं नाव श्यामला करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत ते म्हणाले की, जर जनतेच्या भावना नाव बदलण्याच्या बाजूने असतील तर यावर विचार करण्यास काहीच हरकत नाही. दुसरीकडे, हिमाचल प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरभजन सिंह भज्जी यांनी शिमलाचं नाव अजिबात बदलू नये असं म्हटलं आहे. हे ऐतिहासिक शहर आहे, याचं नाव बदलण्याची काय गरज? नाव बदलल्यामुळे विकास होणार आहे का? अशी टीका करताना शहरांची नावं बदलण्याऐवजी सरकारने विकासावर भर द्यावा असा सल्ला त्यांनी दिला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Himachal govt is planning to rename shimla as shyamala
First published on: 21-10-2018 at 12:46 IST