हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचेच हात भ्रष्टाचारात माखले आहेत, मग या राज्यात विकास होईलच कसा? असा प्रश्न विचारत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सिंह यांच्यावर टीका केली. शिमला या ठिकाणी झालेल्या भाजपच्या रॅलीनंतर त्या बोलत होत्या. ९ नोव्हेंबर ही फक्त मतदानाची तारीख नाही तर काँग्रेसला धडा शिकवण्याची तारीख आहे. काँग्रेसला या राज्यातून हद्दपार करा आणि भाजपला बहुमताने निवडून द्या असे आवाहनही स्मृती इराणी यांनी यावेळी केले. भ्रष्टाचारी नेत्यांच्या मागे जनता कधीच उभी राहात नाही. त्यामुळे हिमाचल प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा आत्मविश्वासही इराणी यांनी व्यक्त केला. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
मागील अनेक वर्षे काँग्रेसकडे देशाची सत्ता होती. मात्र काँग्रेसने देशाचा विकास केला नाही. फक्त पक्ष बळकट कसा होईल हेच पाहिले. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या स्वायत्ततेच्या मुद्द्यावरही त्यांनी टीका केली. एकीकडे देशाचे जवान शहीद होत आहेत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आझादीची भाषा बोलत आहेत. शहीद जवानांचा पी चिदंबरम यांनी अपमान केला आहे असाही आरोप इराणी यांनी केला. काँग्रेसने कधीच विकास करण्यावर भर दिला नाही. शिक्षण, मूलभूत सोयी सुविधा यापासून लोकांना वंचित ठेवले. त्याचमुळे हिमाचल प्रदेशची जनता त्यांना यापुढे स्वीकारणार नाही असेही इराणी यांनी स्पष्ट केले.
हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशात आता काँग्रेस आणि भाजप यांच्याकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. मतदार राजा कोणाला पसंती देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.