हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्यामध्ये एका कारखान्यामध्ये मोठा स्फोट () झालाय. या स्फोटामध्ये सहा महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर १० ते १५ महिला जखमी झाल्यात. स्फोट झाल्यानंतर तातडीने या ठिकाणी मतकार्य सुरु करण्यात आलंय. या स्फोटानंतर समोर आलेले फोटो आणि व्हिडीओ अंगावर काटा आणणारे आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार ऊना येथील हरोलीमधील टाहलीवाल येथील फटाक्यांच्या कारखान्यामध्ये हा स्फोट झालाय. या स्फोटामुळे कारखान्याला आग लागली आणि त्यामध्ये सहा महिला कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांना ऊना येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. नक्की किती लोक या स्फोटात जखमी झालेत याचा निश्चित आकडा सांगता येत नसला तरी सहा महिलांचे मृतदेह मदतकार्य करणाऱ्या टीमच्या हाती लागले आहेत.
मरण पावलेल्यांमध्ये एका तीन वर्षाच्या मुलीचाही समावेश असून कामगार असणाऱ्या आपल्या आईसोबत ही मुलगी कारखान्यात आलेली असं सांगण्यात येत आहे. सर्व महिला उत्तर प्रदेशच्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र प्रशासनाने अद्याप मृत महिलांबद्दल कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नाही.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या स्वत:च्या गाडीने सात जखमींना रुग्णालयात पोहचवलं. जखमींपैकी एका महिलेने दिलेल्या माहितीनुसार स्फोट झाला तेव्हा कारखान्यामध्ये ३० ते ३५ कर्मचारी काम करत होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बघ्यांचीही मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे. या प्रकरणामध्ये आता स्थानिक ग्रामपंचायतीमधील महिला सरपंचांनी या कारखान्यासाठी ग्रामपंचायतीकडून कोणतेही ना हरकत पत्र घेण्यात आलं नव्हतं. हा फटाक्यांचा कारखाना बेकायदेशीर होता असा दावा महिला सरपंचांनी केलाय.