पीटीआय, नवी दिल्ली
Clean chit for Adani: अमेरिकी गुंतवणूकदार संस्था हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांच्या प्रकरणांतून, देशाच्या भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने गुरुवारी अब्जाधीश गौतम अदानी आणि त्यांच्या समूहाची निर्दोष मुक्तता करणारा निवाडा केला. अदानी समूहाने त्यांच्याच बाजारात सूचीबद्ध कंपन्यांमध्ये, प्रवर्तकांशी संबंधित पक्षांचाच वापर करून निधी वळविला आणि त्यायोगे समभागांच्या किमती कृत्रिमरित्या फुगविल्याचा कोणताही पुरावा आढळून आला नसल्याचे नियामकांनी स्पष्ट केले आहे.
दोन वेगवेगळ्या तपशीलवार आदेशांमध्ये ‘सेबी’ने म्हटले आहे की, सखोल चौकशीनंतर इनसाइडर ट्रेडिंग, समभागांच्या किमतीबाबत लबाडी तसेच प्रवर्तकांनी पालन करावयाच्या सार्वजनिक भागधारणा नियमांचे उल्लंघन अदानी समूहाकडून झालेले नसून, त्यासंबंधाने आरोप निराधार ठरतात असा निर्वाळा देत अदानी समूहाला दिलासा दिला.
अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने या शेअर ट्रेडिंगमधील अनियमिततेसंदर्भात आरोप केले होते. स्वत:चे कामकाज कायमस्वरूपी बंद करण्यापूर्वी ‘हिंडेनबर्ग’ने जानेवारी २०२३ मध्ये यासंदर्भातील अहवाल प्रकाशित केला. यामध्ये अदानी समूहातील कंपन्यांनी अॅडिकॉर्प एंटरप्राईझ, माईलस्टोन ट्रेडलिंक्स, रेहवर इन्फ्रास्ट्रक्चर या कथित संलग्न कंपन्यांकडे निधी वळवून त्यामार्फत अदानी पॉवर आणि अदानी एंटरप्राईझ समभागांची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या कथित आरोपांबाबत सेबीने तपशीलवार तपास केल्यानंतर गुरुवारी दोन स्वतंत्र निकालपत्र जाहीर केले.
नमूद केलेल्या कंपन्यांमधील निधी हस्तांतर हे कर्ज स्वरूपात होते, जे तपास सुरू होण्यापूर्वी विविध टप्प्यांमध्ये व्याजासह परत केले गेले होते, असे सेबीने या निकालपत्रात म्हटले आहे. हिंडेनबर्गने उघडकीस आणलेल्या या प्रकरणातील व्यवहार संबंधित पक्ष व्यवहार म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकत नाही. या व्यवहारांमुळे सेबीच्या प्रकटीकरण नियमांचे कोणतेही उल्लंघन झालेले नाही. कारण अॅडिकॉर्प, माइलस्टोन ट्रेडलिंक्स आणि रेहवार इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांबरोबरच व्यवहार नियमानुसारच होते, असे सेबीकडून सांगण्यात आले. दरम्यान, आरोप निराधार होते हे यातून स्पष्ट होते अशी प्रतिक्रिया उद्याोगपती गौतम अदानी यांनी दिली.
अदानी बदनामीप्रकरणी पत्रकारांविरुद्धचा आदेश रद्द
दिल्ली न्यायालयाने रवी नायर, अबीर दासगुप्ता, अयस्कांत दास आणि आयुष जोशी यांना गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडबद्दल (एईएल) कथित बदनामीकारक साहित्य प्रकाशित करण्यापासून रोखणारा एकतर्फी आदेश रद्द केला.