scorecardresearch

‘..तर हिंदू महासभा, मुस्लीम लीग नामशेष झाले नसते’

भारतात जात व धर्माचा आधार घेऊन कोणताच राजकीय पक्ष उभा राहू शकत नाही. जात व धर्माच्या आधारावर लोकांना फितवता आले असते, तर हिंदू महासभा व मुस्लीम लीगचे अस्तित्व संपले नसते.

भारतात जात व धर्माचा आधार घेऊन कोणताच राजकीय पक्ष उभा राहू शकत नाही. जात व धर्माच्या आधारावर लोकांना फितवता आले असते, तर हिंदू महासभा व मुस्लीम लीगचे अस्तित्व संपले नसते. त्यामुळे धर्माची विकृत मांडणी करणाऱ्यांचे अस्तित्व लोकशाहीत नामशेष होईल, असे ठोस प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुक्तार अब्बास नकवी यांनी केले. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात नकवी यांनी राजकीय, धोरणात्मक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. जैन समुदायास अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी समित्या व अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यपदांवर जैन समुदायातील व्यक्तींची नियुक्ती करण्यात येईल, अशी घोषणा नकवी यांनी केली.
नकवी म्हणाले की, धर्माची मांडणी द्वेषमूलक होत आहे. त्यातही मुस्लीम समुदायाच्या मनात मोदी सरकारबद्दल भीती असल्याचा गैरसमज पसरवला जात आहे. ते खरे नाही. मोदी सरकार अल्पसंख्याकांच्या विकासाच्या योजना आखत आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने आखलेल्या सर्वच योजना वाईट नव्हत्या. मात्र त्यांच्या अंमलबजावणीत भ्रष्टाचार झाला. त्यामुळे या योजनांचा बट्टय़ाबोळ झाला. केवळ नाव बदलून आम्ही नव्या योजना आणणार नाही. अल्पसंख्याकांसाठी संपुआ सरकारने आखलेल्या चांगल्या योजना सुरू ठेवणार असल्याचे आश्वासन नकवी यांनी दिले. भारतात अल कायद वा तत्सम दहशतवादी संघटना पाळेमुळे घट्ट करू शकल्या नाहीत. ही सकारात्मक बाब आहे. भारतीय मुस्लिमांचे भवितव्य उज्ज्वल आहे. धर्माच्या आधारावर दिशाभूल करणारे आपल्याच समुदायाचे नुकसान करतात. लव्ह जिहाद, धर्मातरणावर ठोस वक्तव्य करण्याचे मात्र नकवी यांनी टाळले. हिंदू नेहमी भाजपलाच मत देतात-मुस्लीम अजिबातच देत नाहीत, हा समज चुकीचा असल्याचे नकवी  म्हणाले. कुठल्याही धर्मातील मतदार राजकीय पक्षाचे ‘मेरिट-डिमेरिट’ पाहूनच मत देत असतो.

अलीकडेच विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनी या महिला संघटनेच्या मुखपृष्ठावर अभिनेत्री करीना कपूर-खान हिचे छायाचित्र झळकले होते. करीना कपूरचा विवाह लव्ह जिहादचाच भाग असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे. त्यावर नकवी म्हणाले की, प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. देशात प्रत्येक जण असे आरोप-प्रत्यारोप करीत असतो. त्याचा सरकारशी संबंध असतोच असे नाही असे नकवी यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hindu mahasabha muslim league mukhtar abbas naqvi

ताज्या बातम्या