मथुरा : मथुरेतील केशवदेव मंदिराचा गाभारा मशिदीच्या आत असल्याचा दावा करून, तेथे एक धार्मिक विधी करण्याची परवानगी श्रीकृष्ण जन्मस्थान- शाहीद ईदगाह मशीद वादातील एका याचिकाकर्त्यांने स्थानिक न्यायालयाला मागितली आहे.

केशवदेव मंदिराच्या गाभाऱ्याचे ‘शुद्धीकरण’ करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज या याचिकाकर्त्यांने सोमवारी दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात सादर केला. हा गाभारा मशिदीच्या आतील भागात असल्याचा त्यांचा दावा आहे, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले.

‘याचिकाकर्ते दिनेशचंद्र शर्मा हे शाही ईदगाह मशिदीच्या आतील गाभाऱ्याचे गंगा व यमुना नद्यांच्या पाण्याने शुद्धीकरण करून त्याचे पावित्र्य पुनस्र्थापित करू इच्छितात’, असे त्यांचे वकील दीपक शर्मा म्हणाले. अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष असलेले दिनेशचंद्र शर्मा यांनी १९ मे रोजी मथुरेच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांच्या न्यायालयात अशाच प्रकारचा अर्ज सादर केला होता, अशीही माहिती त्यांनी दिली. या अर्जाद्वारे शर्मा यांनी केशवदेव मंदिरातील लड्डूगोपालच्या मूर्तीवर अभिषेक करण्याची परवानगी मागितली होती. ही मूर्तीही मशिदीच्या आत असल्याचा त्यांचा दावा आहे.