येथील प्रसिद्धी माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदू त्यांची मंदिरे आणि त्याच्या शेजारील आवार जमीन माफियांपासून वाचविण्यासाठी जीवापाड प्रयत्न करीत आहेत़  भारत-पाक फाळणीच्या वेळी बहुतेक हिंदूंनी त्यांची मालमत्ता आणि श्रद्धास्थाने मागे ठेवून पाकिस्तानातून पळ काढला होता़  त्यामुळे या मालमत्ता बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकाविण्याचे प्रयत्न स्थानिक भूमाफियांकडून सुरू आहेत़
हिंदू प्रार्थनास्थळाच्या आवाराच्या मोठय़ा जमिनींवर माफियांचा डोळा आह़े  जमिनीच्या किमती चढय़ा असणाऱ्या ठिकाणी  हिंदूंची मंदिरे अधिक आहेत़  त्यामुळे या जागा बळकावून तेथे बाजार बांधण्याचे मनसुबे रचले जात आहेत, असे एक्सप्रेस ट्रिब्युन या दैनिकाने बुधवारी म्हटले आह़े  भूमाफियांच्या कह्यातून एकही मंदिर सुटलेले नाही, असे किर्तारपुरा येथील रहिवासी अमरनाथ यांनी सांगितल़े
मंदिरात हिंदूंना मज्जाव
पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या शंभर वर्षे जुन्या मंदिरात अल्पसंख्याक हिंदू समुदायाला प्रवेश नाकारल्याच्या घटनेची पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी न्यायालयाने पाकिस्तान सरकारला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून अल्पसंख्याक समुदायाला हिंदू मंदिरात प्रवेश मिळण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले.
सर्वोच्च न्यायालयाच्या कराची खंडपीठाने एका याचिकेवर सुनावणी करताना अल्पसंख्याक समुदायाच्या हक्कांचे संरक्षण करण्याबाबत पाकिस्तान सरकारला निर्देश दिले. अर्जदार रीजो माल यांनी याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर पाकिस्तानचे मुख्य न्या. तास्सादक हुसैन जिलानी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सरकारला याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.