नवी दिल्ली : हरिद्वारमधील विद्वेषमूलक भाषणप्रकरणी आरोप असलेले यती नरसिंहानंद यांनी शनिवारी दिल्लीत आयोजित केलेल्या हिंदू पंचायतीमध्ये हिंदूंना हाती शस्त्रे घेण्याचे आवाहन केल्याने पुन्हा वाद निर्माण झाला आहे. या मेळाव्याला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

दिल्लीतील या कार्यक्रमाचा आयोजक असलेल्या प्रीत सिंग याने याआधी जंतरमंतरवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुस्लिमांविरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या. तो सेवा इंडिया फाऊंडेशनचा संस्थापक आहे. यती नरसिंहानंद हे गाझियाबादच्या दसनादेवी मंदिराचे मुख्य असून शनिवारी ते दिल्लीतील मेळाव्यात म्हणाले की, ‘‘जर भारतात मुस्लीम पंतप्रधान झाला तर, त्यापुढील २० वर्षांत ५० टक्के हिंदूंना धर्मातर करावे लागेल. ४० टक्के हिंदू मारले जातील. हे घडू द्यायचे नसेल तर मर्द बनावे लागेल. मर्द होणे म्हणजे काय तर हाती शस्त्र घेणे.’’  या कार्यक्रमास दोनशे लोक उपस्थित होते. प्रीत हा जंतरमंतर प्रकरणात, तर नरसिंहानंद हे हरिद्वार प्रकरणात जामिनावर आहेत. या वेळी उपस्थित पत्रकारांना जमावाने मारहाण केल्याचा आरोप आहे. पण या पत्रकारांना सुरक्षित माघारी आणल्याचा दावा पोलिसांनी केला.