अमरनाथ यात्रेला आजपासून(दि.२७) सुरुवात झाली आणि यात्रेकरुंची पहिली तुकडी जम्मूतील भगवतीनगर बेस कॅम्पमधून रवाना झाली आहे. दरम्यान, दहशतवादी संघटन हिज्बुल मुजाहीद्दीनने अमरनाथ यात्रेकरुंना सुरक्षेचं आश्वासन दिल्याची माहिती आहे. अमरनाथ यात्रेकरु आमचे पाहुणे आहेत, त्यांच्यावर हल्ला करण्याचा आमचा कोणताही विचार नाही असं हिज्बुल मुजाहीद्दीनने एक कथित ऑडिओ क्लिप जारी करुन म्हटलं आहे.

अमरनाथ यात्रेला सुरूवात होण्याच्या एक दिवस आधीच हिज्बुल मुजाहीद्दीनने एक ऑडिओ क्लिप जारी केल्याचं वृत्त आहे. याद्वारे, अमरनाथच्या यात्रेकरुंनी घाबरण्याची गरज नाही, हे श्रद्धाळू काश्मीरमध्ये केवळ भक्तिभावनेने येतात. ते आमचे पाहुणे आहेत. त्यांच्यावर हल्ला करणं हे आमचं लक्ष्य नाहीये, असा संदेश देऊन यात्रेकरुंना सुरक्षेचं आश्वासन दिलं आहे. या क्लिपमध्ये हिज्बुलचा कमांडर रियाज नाइकू याचा आवाज असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही.

आज सकाळी जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बीवीआर सुब्रमण्यम, जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचे सल्लागार विजय कुमार आणि बीबी व्यास यांनी अमरनाथ यात्रेच्या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखविला. यात्रेकरु आज दिवसभर काश्मीर येथील गांदेरबालस्थित बालटाल आणि अनंतनागमधील नुनवान, पहलगाम कॅम्पपर्यंत पोहचणार आहेत. त्यानंतर दुस-या दिवशी पुढील प्रवास करतील, 26 ऑगस्टला रक्षाबंधनच्या दिवशी यात्रा संपेल.