राजौरी :‘‘जम्मू-काश्मीरमधील गुर्जर, बकरवाल आणि पहाडी समाजाला शर्मा आयोगाच्या शिफारशींनुसार आरक्षणाचा लाभ मिळेल,’’ अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केली.

येथे एका सभेला संबोधित करताना शहा म्हणाले, की, गुर्जर, बकरवाल आणि पहाडी समाजाच्या अनुसूचित जाती (एसटी) आरक्षणात कोणतीही घट केली जाणार नाही आणि प्रत्येकाला योग्य वाटा मिळेल. २०१९ मध्ये राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याने जम्मू-काश्मीरमधील समाजातील वंचित घटकांना आरक्षणाचा लाभ देण्याचा मार्ग मोकळा झाला. न्यायमूर्ती शर्मा आयोगाने या संदर्भात शिफारस केली असून त्यात पहाडी, बकरवाल आणि गुर्जर यांचा अनुसूचित जाती आरक्षणाचा त्यात समावेश आहे. लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल व या समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेल. पहाडी समाजाला अनुसूचित जाती दर्जा मिळेल, असे सांगून काही जणांनी गुर्जर आणि बकरवाल समाजाला भडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न या समाजाने हाणून पाडला. विरोधकांचे नाव न घेता त्यांना टीकेचे लक्ष्य करताना, शहा म्हणाले, की पूर्वीच्या जम्मू-काश्मीरमध्ये फक्त तीन राजकीय घराण्यांचे राज्य होते. परंतु आता ३० हजार नागरिकांकडे ही सत्ता आहे. पंचायत व जिल्हा परिषदांत निष्पक्ष निवडणुकांद्वारे त्यांनी आपले प्रतिनिधी निवडून दिले आहेत.

जम्मू-काश्मीरच्या विकासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिले असल्याचे सांगून शहा म्हणाले, की पूर्वी, जम्मू-काश्मीर विकासासाठी केंद्राने पाठवलेला सर्व पैसा काही लोक हडप करायचे. पण आता पैशाचा पुरेपूर विनियोग जनहितासाठी केला जातो. या तिन्ही कुटुंबांच्या तावडीतून काश्मीर सोडवा आणि जम्मू-काश्मीरच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी मोदींचे हात बळकट करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अमित शहा यांच्याकडून वैष्णोदेवीचे दर्शन

जम्मू : नवरात्रोत्सवातील महानवमीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील त्रिकुटा पर्वतावर असलेल्या प्रसिद्ध माता वैष्णोदेवी मंदिरात पूजा केली. शाह यांच्यासह जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह होते.

नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या दिवशी देवीदर्शनासाठी ते हेलिकॉप्टरने सांझी छत येथे पोहोचले. मंदिरात जाण्यापूर्वी शहा यांनी ‘ट्वीट’ करून देशवासीयांना महानवमीच्या शुभेच्छा देताना त्यांनी नमूद केले, की सर्वाना महानवमीच्या शुभेच्छा. आई भगवती तुझी कृपा व आशीर्वाद सर्वावर कायम ठेव. जय माता दी! शहांच्या दौऱ्यामुळे मंदिरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. श्री माता वैष्णोदेवी देवस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुल गर्ग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि पुरोहितांनी शहा यांचे स्वागत केले.

काश्मीरमधील सुरक्षा स्थिती पूर्वीपेक्षा चांगली!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदी सरकारने दहशतवाद्यांविरुद्ध केलेल्या कठोर कारवाईमुळे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा स्थिती पूर्वीपेक्षा चांगली झाल्याचा दावा करून शहा म्हणाले, की यामुळे प्रतिवर्षी शहीद होणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या १२०० वरून १३६ वर आली आहे.