scorecardresearch

जम्मूत कारागृह महासंचालकांची हत्या ; घरातील नोकरास अटक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असताना कारागृहप्रमुखपदी नियुक्त झालेल्या लोहियांची हत्या झाली आहे.

जम्मूत कारागृह महासंचालकांची हत्या ; घरातील नोकरास अटक
जम्मू-काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया

जम्मू :जम्मू-काश्मीरचे कारागृह महासंचालक हेमंत लोहिया यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या यासिर लोहार या २३ वर्षीय तरुणाला मंगळवारी अटक करण्यात आली. रात्रभर राबवलेल्या तपास मोहिमेनंतर कान्हाचक भागातील एका शेतातून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याची चौकशी सुरू आहे.

१९९२ च्या तुकडीतील भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी लोहिया सोमवारी रात्री जम्मूच्या बाहेरील भागात त्यांच्या मित्राच्या घरी मृतावस्थेत आढळले. त्यांच्या अंगावर भाजल्याच्या खुणा आढळल्या तसेच त्यांचा गळा चिरण्यात आला होता. पोलिसांनी सांगितले, की प्राथमिक तपासात या गुन्ह्यामागे दहशतवाद्यांचा हात असल्याचे दिसत नाही. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (पीएएफएफ) या दहशतवादी गटाने लोहिया यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली असली, तरी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी पत्रकारांना सांगितले, की हे दहशतवादी गट निर्लज्जपणे कसलीही जबाबदारी घेतात. आम्हाला या हत्येमागे कोणत्याही दहशतवादी गटाचा सहभाग पुरावा सापडलेला नाही. मात्र, तपासादरम्यान असे काही समोर आल्यास, आम्ही त्या दिशेने तपास करू.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असताना कारागृहप्रमुखपदी नियुक्त झालेल्या लोहियांची हत्या झाली आहे. अतिरिक्त पोलिस महासंचालक मुकेश सिंह म्हणाले, की ही दुर्दैवी घटना आहे. घटनास्थळावरून दलाला मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपीचा आक्रमक वर्तनाचा इतिहास आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या