फ्रान्समध्ये रोबैक्स शहरात पुन्हा काही लोकांना ओलिस ठेवण्याचा प्रकार घडला पण त्यातील संशयित बंदुकधारी मृतावस्थेत सापडला. सर्व ओलिसांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. नॉर्ड भागात काल रात्री अनेक लोसांना ओलिस ठेवण्यात आले व हल्लेखोरांनी पोलिसांवर गोळीबारही केला. हे ओलिस नाटय़ दहशतावादाशी संबंधित नव्हते तर दरोडेखोरीशी संबंधित होते असे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
अभियोक्ते फ्रेड्रिक फेवरी यांनी सांगितले की, ओलिस नाटय़ घडले तेव्हा एक हल्लेखोर रस्त्यावर मृतावस्थेत सापडला असून त्याच्या जवळ एके ४७ रायफलही सापडली आहे. एकाने पिस्तूल उडवले व तो नंतर एका घराबाहेर सापडला. त्याला अटक करण्यात आली. सर्व ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. ओलिस ठेवण्याचा हेतू काय होता व नेमके किती हल्लेखोर पळून गेले हे समजू शकले नाही. हे ओलिस नाटय़ दहशतवादाशी संबंधित नव्हते तर दरोडेखोरीशी संबंधित होते असे दिसून आले आहे.
पोलिस सूत्रांनी सांगितले की, संबंधित भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून घटनास्थळी सुरक्षा कडे करण्यात आले आहे.
ब्रसेल्समधील स्थिती पूर्वपदावर
ब्रुसेल्स- दहशतवादी हल्ल्याच्या भीतीमुळे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्यानंतर बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समधील जीवनमान पूर्वपदावर येत आहे.
बुधवारी स्थानिक शाळा सुरू करण्यात आल्या, तर मेट्रोही नागरिकांना सेवा देण्यास सज्ज झाली आहे. गेल्या आठवडय़ात सोमवारपासून बंद असलेल्या शाळा आणि विद्यापीठातील वर्ग सुरू करण्यात आले. मात्र, अद्यापही दहशतवादी हल्ल्याचा धोका कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.

पॅरिस हल्ल्यांच्या सूत्रधाराला भावाकडून शरणागतीचे आवाहन
ब्रुसेल्स – पॅरिसवरील बाँबहल्ल्यात सहभागी झालेल्या अतिरेक्याला पोलिसांना शरण येण्याचे आवाहन त्याचा भाऊ मोहंमद अब्देसलाम याने केले आहे. त्याचा भाऊ सलाह हा पॅरिसमधील कॅफेसमोरील बाँबस्फोटात सहभागी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्याचा आणखी एक भाऊ इब्राहिम याने याच हल्ल्यादरम्यान स्वतला बाँबने उडवून दिले होते. पॅरिस हल्ल्यांत बळी पडलेल्यांच्या आप्तांच्या दुखात आपण सहभागी असून हा हल्ला थांबविण्यासाठी आपण आणि आपले कुटुंब काही करू शकलो नसल्याची खंत त्याने स्थानिक रेडिओवरून बोलताना व्यक्त केली. आपले भाऊ ब्रुसेल्सवरून पॅरिसला चालल्याची कल्पना आपल्याला होती. परंतु, ते नेमका कोणता कट शिजवत आहेत, याची माहिती आपल्याला नसल्याचे त्याने सांगितले.