नवरदेवाकडील मंडळींना जेवणासाठी ताटं कमी पडल्याने लग्नामध्ये मोठा राडा झाला. हा वाद इतका वाढला की हाणामारी झाली आणि यामध्ये एका युवकाचा मृत्यू तर चार जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या बलिया येथे हा प्रकार घडला. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, बलियाच्या विक्रमपूर येथील रहिवासी हरिकिशन पटेल यांच्या मुलीचं लग्न होतं. बसंतपूर गावातून वरात आली होती. लग्न झाल्यानंतर पाहुण्यांच्या भोजनाचा कार्यक्रम सुरू झाला. पण या दरम्यान जेवणाची ताटं कमी पडली त्यामुळे मुलाकडील काही मंडळींना थोडावेळ थांबण्याची विनंती करण्यात आली. पण मुलाकडील मंडळींनी मुलीकडच्यांना टोमणे मारायला सुरूवात केली आणि वादाला सुरूवात झाली. वाद इतका वाढला की लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली.

पोलीस अधिकारी नन्हू यादव यांनी वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार या हाणामारीत 5 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण रुग्णालयात नेत असतानाच एकाचा मृत्यू झाला. विशाल(20) असं मृत तरुणाचं नाव आहे. घटनेचा तपास सुरू आहे असं पोलिसांनी सांगितलं.