भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि भाऊ तिच्या सुरक्षेची हमी घेतो. पण उत्तर प्रदेशमध्ये भावा-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ३३ वर्षीय भावाने त्याच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करून खून केला. बहिणीने हातावर राखी बांधून काहीच तास उलटल्यानंतर ही संतापजनक घटना घडली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी भावाने बहिणीचा मृतदेह फासावर लटकवला जेणेकरून ही आत्महत्या वाटेल.
एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, शनिवारी अल्पवयीन बहिणीने ३३ वर्षीय सुरजीतला राखी बांधली. त्यानंतर सायंकाळी सुरजीत दारू पिऊन घरी परतला. बहीण झोपेत असताना त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर मृतदेह फासावर लटकवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते. मात्र त्यांना याचा सुगावा लागला नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर कुटुंबियांनी याची माहिती पोलिसांना दिली. घृणास्पद गुन्हा केल्यानंतर सुरजीतकडून पोलिसांची दिशाभूल करण्यात येत होती. तपास भकटला जावा, याचा त्याने प्रयत्न केला. मात्र कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याला तो बोलू देत नसल्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला.
पोलिसांनी घराची पाहणी केल्यानंतर ही आत्महत्या नसल्याची खात्री पटली. घरात अनेक ठिकाणी रक्ताचे डाग दिसून आले होते. अल्पवयीन पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला, त्यात तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सुरजीतची कसून चौकशी केली असता त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केला.
ओडिशात शालेय विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार
ओडिशामध्येही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. केंद्रपाडा जिल्ह्यातील एका गावातील शाळेत १५ वर्षीय मुलीवर पाच लोकांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे मुलीचे जवळचे नातेवाईक आहेत. पोलिसांनी २९ वर्षीय मुख्य आरोपीला अटक केली आहे. त्यांच्यावर पोक्सो आणि बीएनएसच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.